लोकमत न्यूज नेटवर्क थिवी: 'खासदार निधीतून उत्तर गोव्यात कितीतरी लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. यापुढेही कामे सुरूच राहतील. त्यासाठी आणि गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा आपण संधी द्यावी' असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. नाईक यांनी अस्नोडा येथील शांतादुर्गा देवस्थानाला भेट देऊन अप्रत्यक्षपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली.
मांद्रे मतदारसंघाचा दौरा करून मंत्री नाईक यांनी रात्री शांतादुर्गा देवस्थानामध्ये दर्शन घेतले. ते म्हणाले, खासदार निधीतून सार्वजनिक हॉल, पंचायत घरे, देवालये, फुटबॉल मैदाने उभी राहिली आहेत. अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. काही कामे सुरू असून आणखी काही कामांचा प्रस्ताव आहे. २०२४ च्या निवडणुकीत सर्वांनी भाजप सरकारला पाठिंबा द्यावा आणि पुन्हा सेवेची संधी द्यावी.
राज्य सरकार गोव्याची धुरा योग्य प्रकारे सांभाळत आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांनी गोव्यात दोन्ही ठिकाणी भाजपला निवडून देऊन सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहावे. मंत्री नाईक म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने राज्यात कितीतरी महत्त्वाचे प्रकल्प राबविले आहेत. 'सरकार तुमच्या दारी' कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. इतर राज्यांतही असाच प्रयोग राबविण्यात येणार आहे,' असे त्यांनी सांगितले.
मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी आपले विचार व्यक्त केले. अस्नोडाच्या सरपंच सुषमा मालवणकर, पंच सदस्य, थिवीचे भाजप गटाध्यक्ष विश्वनाथ खलप, सचिव उदय वारंग, पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते.