किशोर कुबल / पणजी
पणजी : गोव्यात येत्या सोमवारपासून सुरु होणार असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रमेश तवडकर यांनी आज घेतली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अन्य विरोधी आमदारांनी वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. विधानसभेत विरोधी आमदारांना प्रश्न मांडण्यास पुरेसा वेळ मिळायला हवा तसेच प्रश्नांची उत्तरे ४८ तास आधी उपलब्ध करावीत व पाच वर्षांपेक्षा जुनी माहितीही उत्तरात असायला हवी, असे प्युरी म्हणाले.
बैठकीनंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना युरी म्हणाले की, ' या सरकारला कोणतीही पत राहिलेली नाही. प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे. म्हादई, भ्रष्टाचार, वाढती बेकारी, कला अकादमी नूतनीकरणातील घोटाळा, राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट बांधकाम या सर्व प्रश्नांवर आम्ही सरकारला घेरणार आहोत. पाच वर्षांपूर्वीची माहिती उत्तरात ने देणे ही मर्यादा का? असा संतप्त सवाल करून ते पुढे म्हणाले की, या सरकारला माहिती लपवायची आहे म्हणून उत्तरे देण्याचे टाळले जाते. वास्तविक आरटीआय अर्जाला उत्तरात कितीही जुनी माहिती मिळू शकते, तर विधानसभेतच ही मर्यादा का असायला हवी?, असा प्रश्न त्यांनी केला. सरकार महत्त्वाची विधेयके घिसाडघाईने संमत करते, यावरही त्यांनी जोरदार टीका केली.
आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, 'या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी विरोधी आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यावेच लागेल. सत्ताधाऱ्यांकडे जास्त संख्याबळ आहे म्हणून विरोधकांचा आवाज दाबू नये.आम्ही या अधिवेशनात सरकारला व मंत्र्यांना त्यांच्या गैरकृत्यांबद्दल उघडे पाडू.'