लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात आणि राज्यात प्रत्येक माणसाच्या मनात दहशत निर्माण केला आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याविरोधात प्रत्येकाने लढणे अपेक्षित आहे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढाई ही मुक्ती मिळवण्याची शेवटची लढाई आहे. त्यामुळे निर्णायक लढा द्या. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भविष्यात लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही निर्माण होईल, याचा प्रत्येक मतदाराने विचार करून बदल घडवून आणायलाच हवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पेडणे येथे केले.
पेडणे येथील शासकीय विश्रामगृहात पेडणे गट काँग्रेस पक्षाकडून आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, इतर पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रदेश काँग्रेस सचिव विजय भिके, सचिव सुदिन नाईक, उत्तर गोवा सचिव प्रणव परब, युवाध्यक्ष जोएल आंद्रेद, पेडणे मतदारसंघ गटाध्यक्ष कृष्णा नाईक, सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर, प्रकाश किनळेकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात मोठमोठे प्रकल्प आणून युवकांना भूलवत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पेडणेतील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला जमीन दिलेल्या भूमिपुत्रांना डावलून मोपा विमानतळावर परप्रांतीयांना रोजगार आणि नोकरी उपलब्ध करून दिली. भूमिपुत्रांना स्वतंत्र टॅक्सी काउंटरसाठी आपल्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे.
पेडणेतील शासकीय विश्रामगृहात सोमवारी संध्याकाळी पेडणे मतदारसंघातील गट समितीतर्फे आयोजित कार्यकर्ता बैठक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते सखाराम परब यांनी केले. पेडणे मतदार संघाचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. काँग्रेसच्या या बैठकीत काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, तिळारी कालवा, पेडणे तालुक्याला जोडणारा कोलवाळचा पूल, चांदल येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ही काँग्रेस पक्षाची देणं आहेत. चारपदरी महामार्ग, पाणी, सौरउर्जा, पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती ही काँग्रेसची कल्पना आहे. उत्तर गोव्यातून २५ वर्षात काँग्रेसचा खासदार नाही. त्यासाठी बदल अपेक्षित आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना अणुबॉम्बद्वारे जगाला आपली ताकद दाखवून दिली, देशाचे सामर्थ्य निर्माण कार्य काँग्रेसने केली. प्रगतीचा पाया कॉंग्रेसने रचला, काँग्रेसने देशाला सामर्थ्यवान सरकार दिले. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी बुथ सक्रिय होणे आवश्यक आहे, असे अॅड. खलप म्हणाले.
महामार्गाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह
पेडणेतील महामार्ग भावी पिढी नष्ट करणार, एवढा दर्जाहीन बनवला आहे. कामानिमित्त दररोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची हाडे खिळखिळी बनत आहेत. तरीही भाजपच्या प्रलोभनांना भुलून युवक भाजपलाच साथ देत आहेत, हे दुर्देवी आहे, असे पाटकर म्हणाले. सुकेकुळण धारगळ येथील अपघातात स्थानिक आमदाराने राजकारण केले. एवढेच नव्हे, कथित आर्थिक व्यवहारही केला, असा आरोप केला. अशा प्रकारचे भ्रष्ट सरकार सत्ताभष्ट होण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना म्हादई का वाचवू शकले नाहीत, याचा जाब लोकोनी विचारायला हवा, असे पाटकर यांनी सांगितले.