लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोलकाता येथील एका युवा महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तिच्याशी कूकर्म केलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई व्हावी यासाठी देशव्यापी आंदोलन डॉक्टर्सनी छेडले आहे. राज्यातही याचा परिणाम दिसून आला असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) डॉक्टर्सनी हॉस्पिटलबाहेर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी अचानक ओपीडीदेखील बंद करण्यात आली असून, याचा प्रचंड परिणाम रुग्ण सेवेवर झाला आहे.
गोमेकॉ बाहेरच या विद्यार्थ्यांनी ठान मांडून, घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. डॉक्टर्सच्या या आंदोलनामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांवर मोठा परिणाम झाला. ओपीडी सुरू असतानाच हे आंदोलन सुरू झाल्याने ओपीडी अर्धवट बंद करून डॉक्टर्स आंदोलनात सहभागी झाले. सकाळी काही मोजक्याच रुग्णांवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले; पण नंतर ओपीडीच बंद करण्यात आली. अनेक रुग्ण पहाटे ६ वाजल्यापासून ओपीडीबाहेर थांबले होते, नंतर त्यांना बंद असल्याचे सांगून घरी पाठविण्यात आले.
ओपीडी दोन दिवस बंद असण्याची शक्यता
गोमेकॉतील डॉक्टर्स विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केल्याने रविवारपर्यंत ओपीडी बंद असल्याचे संकेत मिळत आहे. याबाबत अद्याप काही ठोस निर्णय गोमेकॉतर्फे जाहीर करण्यात आलेला नाही. पण डॉक्टर्सचा आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहता ओपीडी पुढील दोन दिवस बंद असण्याची दाट शक्यता आहे.