पणजी : गोवा डेअरीचा उसगांव येथील पशुखाद्य प्रकल्प गुजरातमधील सुमूल डेअरी ताब्यात घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र गोवा डेअरीचे चेअरमन माधव सहकारी यांनी हे वृत्त फेटाळून लावताना सध्या हा कारखाना नफ्यात असल्याचा दावा केला आहे.सहकारी म्हणाले की, ‘उसगांव येथील पशूखाद्य प्रकल्प सुमूल घेणार ही निव्वळ अफवा आहे. आमच्यापर्यंत अशी कोणतीही माहिती अजूनपर्यंत आलेली नाही. या कारखान्याला गेल्या वर्षी 5 कोटी रुपये तोटा झाला होता याचे कारण उच्च प्रथिनयुक्त पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारी सरकी पेंड, मका, सफेद पॉलिश राइस आदी सर्व कच्चा माल शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशमधून आणावा लागतो त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. यंदा मात्र नफा होऊ लागला आहे.’
गोवा डेअरीशी १७९ दुध उत्पादक संस्था संलग्न असून त्याती ३६ सोसायट्यांना दूध साठविण्यासाठी बल्क मिल्क कूलर देण्यात आलेले आहेत. उर्वरित सोसायट्यांनाही ते दिले जातील. यामुळे आता तेथल्या तेथे दूध थंड करता येते. आधी दूध सोसायट्यांकडे दूध संकलन झाल्यानंतर प्रत्यक्षात ते डेअरीपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच तास लागायचे यामुळे दूध खराब होत असे.
दोन मोठे टँकर्स खरेदी करणारसोसायट्यांमधून दूध वाहतुकीसाठी प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमतेचे दोन मोठे टँकर्स खरेदी करण्याचे डेअरीने ठरविले आहे. कूलरची अद्ययावत सुविधा असलेल्या या टँकरची प्रत्येकी २२ लाख रुपये किंमत आहे. सध्या दोन टँकर्स भाडेपट्टीवर कार्यरत आहेत. केंद्राच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेअरी डेव्हलॉपमेंट योजनेंतर्ग गोवा डेअरीला १६ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. ७ कोटी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ताही डेअरीला प्राप्त झालेला आहे. त्या अंतर्गत सुधारणा हाती घेण्यात येत आहे. दिवशी 200 लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन असलेल्या शेतक-यांना मिल्क कूलर देण्यात येत आहेत.
सुरत डिस्ट्रिक्ट को आॅप मिल्क प्रोड्युसर्स युनियन (सुमूल)ने गोव्यात प्रवेश केल्यापासून वेगवेगळ्या वावड्या उठत आहेत. एकीकडे उसगांवचा पशुखाद्य प्रकल्प सुमूल ताब्यात घेणार अशी चर्चा असताना दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत या प्रकल्पाला सुमारे ८ लाख रुपये नफा झाल्याचा दावा दुध उत्पादक महासंघाने केला आहे. शेतक-यांना सध्या पशुखाद्य १६.८0 रुपये प्रती किलो या सवलतीच्या दरात दिले जाते.