पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून बुधवारी भाजपात आलेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज गुरुवारी (11 जुलै) दुपार पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत.
बुधवारी मध्यरात्रीच्या विमानाने सर्व दहा आमदार दिल्लीला गेले. दिल्लीतील गोवा निवासमध्ये दहाही आमदार व मुख्यमंत्री आणि भाजपा कोअर टीम यांची गुरुवारी सकाळी अनौपचारिक बैठक झाली. मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार आहे. शहा यांना सकाळी साडेदहा वाजता भेटावे असे ठरले होते. केंद्रीय गृह मंत्री असलेले शहा हे संसदेच्या अधिवेशनात आणि कर्नाटकमधील राजकीय घडामोडींशीनिगडीत विषयांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत गोव्यातील नेते शहा यांना किंवा जे. पी. नड्डा यांना भेटू शकले नाहीत. आज गुरुवारी दुपारनंतर हे सगळेजण गोव्यात परततील आणि मग सायंकाळीच चार आमदारांचा शपथविधी होईल.
बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. कारण कवळेकर हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार फुटले. कवळेकर यांनी काँग्रेस पक्ष यापूर्वी कधीच सोडला नव्हता. चार वेळा ते केपे मतदारसंघातून निवडून येऊन विधानसभेत पोहचले पण कधीच मंत्री झाले नाही. आता त्यांना उपमुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल. या शिवाय फिलीप नेरी रॉड्रीग्ज, मायकल लोबो आणि बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. मोन्सेरात हे यापूर्वीही एकदा भाजपामध्ये होते आणि त्यांनी पर्रीकर मंत्रिमंडळात काम केले होते. लोबो हे कधीच मंत्री झाले नव्हते. फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांनीही काही वर्षापूर्वी पर्रीकर मंत्रिमंडळात काम केले होते. गोव्यातील राजकीय घडामोडी हा सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा व टीकेचा विषय बनला आहे.
ब्लॅकमेलिंग, आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
गोव्यात काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांनी विधिमंडळ पक्ष भाजपामध्ये विलीन केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जळजळीत प्रतिक्रिया देताना भाजपाने ब्लॅकमेलिंग करून तसेच आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजपा त्यांच्या घटक पक्षांबरोबर असुरक्षित होता, हे या घटनेतून उघड झाले. विधानसभेत स्वतःकडे पुरेसे संख्याबळ असतानाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशा प्रकारची अनैतिक राजकीय खेळी करतात यावरून आगामी विधानसभा अधिवेशनात विरोधकांना सामोरे जाण्याचे बळ त्यांच्याकडे नव्हते, त्यांना भीती वाटत होती, हे उघड झाल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली.