- किशोर कुबल पणजी - वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहन खरेदीवर मोटार वाहन करात १५ ते २५ टक्के सवलत मिळणार आहे. यासंबंधीची अधिसूचना गोवा वाहतूक खात्याने काढली आहे. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना करात १५ टक्के सवलत किंवा ठेव प्रमाणपत्रावर दर्शविल्यानुसार वाहनाच्या स्क्रॅप मूल्याच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते मिळेल. सार्वजनिक वाहतुकीत नसलेल्या वाहनांना २५ टक्के किंवा वाहनाच्या स्क्रॅप मूल्याच्या ५० टक्के, ठेव प्रमाणपत्रावर दर्शविल्याप्रमाणे जे कमी मूल्य असेल ते दिले जाईल. गोवा सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत आठ वर्षांपर्यंत आणि इतर वाहनांच्या बाबतीत पंधरा वर्षांपर्यंत कर सवलत असेल. अनुक्रमे आठ वर्षांनंतर व पंधरा वर्षानंतर करात कोणतीही सूट मिळणार नाही. ज्याने वाहन स्क्रॅपिंगसाठी सादर केले आहे त्याला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट प्रमाणपत्र देण्यात येईल.
१५ वर्षांपेक्षा अधिक वर्षांची सर्व जुनी वाहने मोडीत काढावी लागणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केली जात आहेत. गोव्यात लोकसंख्या १६ लाख असली तरी राज्यात दुपटीने वाहने आहेत.