पणजी : राज्यात चौदा दिवसांत १७५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार गेल्या चौदा दिवसांत जेवढे नवे कोविड रुग्ण आढळले. त्यापैकी १७५६ रुग्ण हे कोविडच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर आले. गेल्या चौदा दिवसांत राज्यात एकूण सुमारे २६ हजार ८०० कोविड चाचण्या झाल्या आहेत.
राज्यात रोज नवे सव्वाशे ते दीडशे कोविड रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत कोविडवर मात करण्यात यशस्वी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणे गरजेचे आहे. एखाद्या दिवशी १६० नवे कोविडग्रस्त आढळले तर जुन्या रुग्णांपैकी १५० रुग्ण त्या दिवशी ठीक झालेले असतात असे आकडेवारी दाखवून देते. दि. ७ डिसेंबरला मात्र वेगळे चित्र अनुभवास आले. त्या दिवशी फक्त ९० नवे कोविडग्रस्त आढळले व १५४ रुग्ण ठीक झाले. ६ डिसेंबर रोजी ११२ नवे रुग्ण आढळले व १३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. २९ नोव्हेंबर रोजी नवे ११५ कोविडग्रस्त आढळले आणि १३५ जुने कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. २५ नोव्हेंबर रोजी फक्त ६१ कोविडग्रस्त आजारातून ठीक झाले. त्या दिवशी नवे १२५ कोविड रुग्ण आढळले.
काही प्रमुख भागांतील कोविड रुग्ण संख्याअजुनही काही भागांमध्ये कोविड रुग्णांची संख्या एकदम कमी झालेली नाही. मडगावमध्ये अजून शंभरहून अधिक कोविडग्रस्त आहेत. कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात अजून ६१ कोविडग्रस्त आहेत. या क्षेत्रातच एक झोपडपट्टी देखील येते. फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात अजून ७६ कोविडग्रस्त आहेत. पणडीत ७४ तर शिवोली आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५० कोविडग्रस्त आहेत. पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात पूर्वी रुग्ण संख्या कायम शंभरहून अधिक असायची. तिथे आता रुग्ण संख्या ८० पर्यंत खाली आली आहे.