पणजी : गोव्यात विदेशी व्यक्तींनी कधी स्थानिकांना हाताशी धरून तर कधी परस्पर ड्रग्ज विक्रीचे जाळे पसरविले. पोलिसांनी कारवाईची मोहीम व्यापक करताना गेल्या चार वर्षात एकूण 180 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. सुमारे साडेसोळा कोटी रुपये किंमतीचे हे पदार्थ आहेत. गोवा सरकारच्या अधिकृत आकडेवारीवरून राज्यातील कारवाईचे प्रमाण कळून येते.
पाच वर्षात एकूण 377 व्यक्तींना गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने ड्रग्ज व्यवहार प्रकरणी अटक केली आहे. यात 108 परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. एकूण अटक झालेल्या व्यक्तींमध्ये 146 व्यक्ती या परराज्यांमधील आहेत. देशाच्या विविध भागांतून आणि परदेशातूनही पर्यटक म्हणून गोव्यात येणा-या अनेक व्यक्ती या प्रत्यक्षात गोव्यात अंमली पदार्थ पुरवठा आणि विक्रीचे व्यवहार करतात असे आढळून येते.
अनेक विदेशी व्यक्ती बोगस विद्यार्थी व्हिसा प्राप्त करतात आणि गोव्यात येऊन अनेक महिने राहतात. प्रत्यक्षात ते विद्यार्थी नसतातच. ते अंमली पदार्थ विक्रीचे धंदे करतात. पाच वर्षात गोव्यात अटक झालेल्या अनेक व्यक्ती ह्या उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, कुलू मनाली, काश्मिर, पंजाब अशा भागातील आहेत. गोव्याला उडता गोवा बनविले जाऊ नये, अशी मागणी गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच आमदार करू लागले आहेत.
2017 सालच्या अकरा महिन्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 179 व्यक्तींना गोव्यात अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटक झाली आहे. पूर्वी वार्षिक सरासरी साठ किंवा सत्तर व्यक्तींनाच अटक होत होती. 2017 साली पोलिसांनी एकूण 74 कोटींपेक्षा जास्त अंमली पदार्थ पकडले. पूर्वी वार्षिक सरासरी तिस ते पन्नास किलो अंमली पदार्थ पकडले जात होते. 2क्14 साली एकूण 58 व्यक्तींना पोलिसांनी अटक करतानाच 36 किलोंपेक्षा जास्त अंमली पदार्थ पकडले होते. त्यांची किंमत 2 कोटी 97 लाख 53 हजार रुपये एवढी होती.
2015 साली पोलिसांनी 71 व्यक्तींना अटक केली व 17 किलोंपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले होते. त्याची किंमत 1क् कोटी 59 लाख 58 हजार रुपये होती. 2016 साली पोलिसांनी 69 व्यक्तींना अंमली पदार्थ विक्री व्यवहार प्रकरणी अटक केली व 53 कोटींपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. या ड्रग्जची किंमत 1 कोटी 2 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अलिकडे ड्रग्जचे मोठे वितरक हे विदेशी पर्यटकांचाच वापर जास्त प्रमाणात ड्रग्जच्या विक्रीसाठी करतात. कारण एक विदेशी पर्यटक दुस-या विदेशी पर्यटकाशी सहज संपर्क साधू शकतो. पोलिसांच्या कारवाई मोहीमेमुळे ड्रग्जच्या धंद्यातील व्यक्तींनी स्वत:ची पद्धत बदलली आहे. त्यामुळे पोलिसांसमोरही कारवाई मोहीम व्यापक करताना नवी आव्हाने उभी ठाकू लागली आहेत. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनातही वाढत्या ड्रग्ज व्यवहारांविषयी चिंता व्यक्त झाली आहे.