मडगाव - बँकेतून कर्ज उकळण्यासाठी कोण कुठली नामी शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही. गोव्यातील बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखांमध्ये खोटे सोने गहाण म्हणून ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. कुंकळळी पोलिसांनी या प्रकरणी 37 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यातील 19 जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अन्य काही जणांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. या बँकेसाठी सोन्याचे मूल्यांकन करणारा शाणु लवू लोटलीकर हा या प्रकरणात प्रमुख सूत्रधार असल्याचे प्राथमिक तपासात आतापर्यंत उघड झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर दोन जणांची प्रकृती बिघाडल्याने त्यांना उपचारासाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करावे लागले. यामध्ये एक पुरुष आणि महिलेचा समावेश होता. संबंधित महिलेची प्रकृती सुधारल्याने तिला पुन्हा पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिली. सर्व संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 120 (ब) अंर्तगत गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस तपासात शाणु लोटलीकर यांच्यासह सुरेखा मांद्रेकर, राजेश कारेकर आणि सूचिता नाईक हे या प्रकरणात प्रमुख संशयित असल्याचेही उघड झाले आहे. 2017 ते 2019 या कालावधीत हा गैरव्यवहार झाला होता. बँक ऑफ इंडियाच्या वेळळी, कुंकळळी व चिंचणी शाखेत हा गैरव्यवहार झाला होता. वेळळी शाखेतून 72. 87 लाख तर कुंकळळी शाखेतून 31.83 लाख रुपये आणि चिंचणी शाखेमधून 1.48 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. बनावट सोने गहाण म्हणून ठेवून कर्ज घेण्यात आले होते. मात्र हे कर्ज फेडले न गेल्याने बँकेने या सोन्याचा लिलाव करण्याचे ठरविले असता हा बनावटपणा उघडकीस आला.
वेळळी येथील प्रकरणात शाणु लोटलीकर यांच्यासह सुभाष गावकर, भारती होडारकर, रमेशकुमार शास्त्री युसुफ पिरजादे, चेतन प्रभू, प्रेमराज पांडे, नङिाया पिरजादे, श्रेया प्रभू, शालिनी नाईक, राजेश कारेकर, तर कुंकळळी शाखेत भागी भलबद्रा, सुरेखा मांद्रेकर, शांती च्यारी, विदयूत खेडेकर आणि आकांक्षा गावकर हे संशयित आहेत. चिंचणीतील प्रकरणात राजेश कारेकर, अपुर्वा कारेकर, सुंगधा लिंगडुकर , रुपाली नाईक, गौरी नाईक, गोकूळदास नाईक, नागेश नाईक, नीता नाईक, मार्टीना बर्ाेटो, सुचिता नाईक, सुरेखा मांद्रेकर, सुचिता गुरव, भागी भलबद्र, अमरकुमार देवर, पदमावती भलबद्रा, व्हिटनी फर्नाडीस, सपना नाईक, प्रेमराज पांडे, आश्विनी नाईक, एस.च्यारी, रेखा कारेकर, के. नायर हे संशयित आहेत.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक पुढील तपास करीत आहेत.