- किशोर कुबल पणजी : गोव्यात विधिमंडळ खात्याने गेल्या वर्षी २७ आणि २८ जून येथील ‘ताज विवांता’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांसाठी घेतलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेवर तब्बल २४ लाख ९६ हजार ५०० रुपये खर्च केले.
सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रीग्स यांना आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून ही माहिती प्राप्त झाली आहे. मुंबईस्थित एनजीओ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेला कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. या संस्थेला एकूण २४ लाख १३ हजार १०० रुपये दिले. आमदार उल्हास तुयेंकर आणि आमदार कृष्णा साळकर यांच्या फ्रेमसह फोटोग्राफीसाठी ८० हजार रुपये आणि व्हिडिओग्राफीसाठी ३,४०० रुपये खर्च करण्यात आले.
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, डॉ अनंत काळसे, डॉ. हरीश शेट्टी, राम नाईक, देश दीपक वर्मा आणि सतीश महाना हे प्रशिक्षण कार्यशाळेचे सहा वक्ते होते. त्यांच्यावर प्रवास, मानधन, भोजन आणि निवास यावर एकूण साडेचार लाख रुपये खर्च करण्यात आले. दोन दिवसांच्या कार्यक्रमात स्टेज सजावट आणि स्मृतिचिन्ह यासाठी २ लाख रुपये तर आमदारांच्या चहापानावर ५ लाख रुपये खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी ‘ताज विवांता’च्या भाड्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये नाही. आयरिश यांनी आमदारांच्या या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या फाईल नोटिंग्स आणि पत्रव्यवहाराची प्रत मागितली होती आणि कार्यक्रमावर झालेल्या खर्चाचा संपूर्ण तपशीलही मागितला होता. त्यांना तो प्राप्त झालेला आहे.