मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यात रावणफोंड येथे एक प्रवासी बस उलटल्याने 26 प्रवासी जखमी झाले. यात एक प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी पणजी येथील बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सचिन देसाई (२१) असे त्याचे नाव आहे. अन्य 9 जणांवर मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी 8.30वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी पुढील चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांनी दिली.
सावर्डेहून मडगावला येणाऱ्या ही बस प्रवाशांनी भरलेली होती. सकाळी कामानिमित्त सावर्डेहून मडगावला येणा-या प्रवाशांना घेऊन ही बस येत होती. रावणफोंड येथील लकाकी येथे पोहोचल्यानतंर गतीरोधकरावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला व बसने एका कारला धडक देऊन नंतर बस उलटली. अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यामुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या अपघातबाबत कळविल्यानंतर संबधितांना घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनीही जखमींना बसमधून बाहेर काढून नंतर अॅम्बुलन्समधून इस्पितळात नेण्यास मदत केली. अपघातामुळे या भागातील वाहतूकही खोळंबली होती. वाहतुक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.