- सूरज नाईकपवार मडगाव - आधीच विकलेला फ्लॅट अन्य एकाला विकून त्याच्याकडील १२ लाखांची रोकड घेउन फरार झालेल्या भामटयाला गाेव्यातील फातोर्डा पोलिसांनी तेलंगणा राज्यातील हैदरबाद येथे जेरबंद केले. भास्कर बेगारी (४६) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ आंध्र प्रदेश राज्यातील आहे. १ ऑगस्ट २०१४ साली ही घटना घडली होती. गोव्यात आणल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. हैदरबाद येथील मियापूर येथे पोलिसांनी भास्करच्या मुसक्या आवळल्या.
नंतर त्याला ट्रान्झिट वाँरन्टवर गोव्यात आणल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली. फातोर्डा पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात सुरेंद्र नाईक यांनी तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या आईला संशयिताने गंडविले होते. आगाळी घोगळ येथील लत्ता रेसिडेन्सी या इमारतीतील सदनिका त्याने तक्रारदाराच्या आईला विकली होती.फ्लॅट खरेदीबाबत नोंदणीसाठी सबरजिस्टार कार्यालयात ती गेली असता , सदर फ्लॅट यापुर्वीच संशयिताने अन्य एकाला विकल्याचे स्पष्ट झाले होते.
मागाहून या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यानंतर भास्कर विरुध्द फसचणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गावकर यांनी या प्रकरणाचा तपास करताना , शेवटी संशयिताला गजाआड केले.