सदगुरू पाटील, पणजी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रविवारी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते मनोहर पर्रीकर यांची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि या पदाची शपथ घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली. तत्पूर्वी पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्यासाठी बहुमत असल्याचा दावा केला होता.राज्यपालांचे सचिव रुपेशकुमार ठाकूर यांनी रविवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, पर्रीकर यांनी दावा सादर करताना भाजपाचे १३, मगोपाचे ३, गोवा फारवर्ड पार्टीचे ३ आणि अपक्ष २ अशा २१ जणांची यादी पान १ वरून राज्यपालांना सादर केली.पर्रीकर हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व भाजपाचे गोवा प्रभारी नितीन गडकरी हे शनिवारी रात्री गोव्यात दाखल झाले. रविवारी सकाळपासून जोरदार हालचाली सुरू झाल्या आणि आघाडी सरकार स्थापन करावे, असे ठरले. पर्रीकर यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वप्रथम मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी पाठिंबा दर्शविला. मगोपकडे तीन आमदार आहेत. त्यानंतर गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनीही पाठिंब्याची हमी दिली. गोवा फॉरवर्डकडेही तीन आमदार आहेत. पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि प्रसाद गावकर या तीन अपक्षांनीही पर्रीकर यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला. गडकरी यांच्यासोबत सर्व २१ आमदारांना घेऊन पर्रीकर यांनी रविवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली व आपल्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले.निकालानंतर २४ तासांत काँग्रेस आपला नेता ठरवू शकला नाही. मुख्यमंत्री पदासाठी प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो व दिगंबर कामत इच्छुक होते. दिग्विजय सिंग यांनी गुप्त पद्धतीने १७ आमदारांचे मतदानही घेतले. रात्रीपर्यंत हा निकालही त्यांनी जाहीर केला नाही. फालेरो यांचे नेतृत्व स्वीकारण्यास मगोप तसेच गोवा फॉरवर्डही तयार नव्हता. त्यांनी भाजपाप्रणीत आघाडीची वाट धरली.पक्षीय बलाबलसंख्या : ४०बहुमतासाठी गरज : २१भाजपा : १३काँग्रेस : १७महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) : ३गोवा फॉरवर्ड : ३राष्ट्रवादी काँग्रेस : १अपक्ष : ३
गोव्यामध्ये पुन्हा पर्रीकर सरकार!
By admin | Published: March 13, 2017 4:31 AM