वास्को (गोवा) - आज दुपारी गोव्याच्या दाबोळी विमानतळ धावपट्टीवरून कवायतीसाठी उड्डाण केलेल्या नौदलाच्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानाच्या तेलाची टाकी खाली कोसळून धावपट्टीवर आग लागण्याची घटना घडली. ह्या घटनेमुळे धावपट्टीची नुकसानी झालेली असून, घटनेनंतर विविध ठिकाण्यावरून दाबोळी विमानतळावर येणार असलेली विमाने मुंबई व बंगळूरु विमानतळावर वळवण्यात आली.दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. नेहमी प्रमाणे भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ‘मीग’ लढाऊ विमानाने दाबोळी विमानतळ धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर अचानक ह्या विमानाच्या तेलाची टाकी खाली कोसळून तिचा स्फोट होऊन येथे भयंकर आग लागली. ह्या टाकीत तेलाचा साठा भरलेला असल्याची माहीती सूत्रांनी देऊन आग लागल्यानंतर परिसरात भयंकर अशा धुराचे लोण पसरल्याने सुरवातीला ह्या भागात नागरीकात भीतीचे वातावरण पसरले. सदर घटना घडताच दाबोळी विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षा यंत्रणांनी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन येथे लागलेली आगे विझवण्याच्या कामाला सुरवात केली. लागलेली आग विझवून येथे निर्माण झालेला धोका दूर झाल्याची सुरक्षा यंत्रणांनी नंतर पूर्णपणे खात्री करून घेतली. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता नौदलाच्या लढाऊ विमानाची तेलाची टाकी कोसळल्याने धावपट्टीची काही प्रमाणात नुकसानी झाल्याची माहीती त्यांनी दिली.
मिग-29के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग, गोवा विमानतळावरील वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 5:03 PM