पणजी : गोव्यात काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकसंध असल्याचा दावा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला असून पक्षात कोणतीही फूट पडणे शक्य नाही, असे म्हटले आहे.आमदार दिगंबर कामत यांच्यासह पक्षाचे काही आमदार काँग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडण्याच्या आणि हा गट भाजप सरकारला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरत आहे. या निव्वळ अफवा आहेत. भाजपा सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सरकारमधील घटक पक्ष तसेच त्यांचे स्वत:चेच आमदार सरकारच्या कारभारावर समाधानी नाहीत, हे भाजपाला कळून चुकले आहे, त्यामुळे भाजपाकडूनच या अफवा पसरविल्या जात आहेत, असे कवळेकर यांनी म्हटले आहे.दिगंबर कामत यांच्यासह फिलिप नेरी रॉड्रिग्स, सुभाष शिरोडकर व टोनी फर्नांडिस कॉंग्रेसमधून फुटणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. यासंबंधी कवळेकर पुढे म्हणतात की, राज्यातील भाजपा आघाडी सरकार आपणहून कोसळण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे आमदार आणि सरकारमधील घटक पक्ष समाधानी नाहीत, त्यामुळे अशा अफवा पसरवून बचावात्मक राजकारणाची घाणेरडी खेळी भाजपा खेळत आहे.कवळेकर पुढे म्हणतात की, अनेक मंत्री, आमदार आजारी आहेत. कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांकडून वाढता दबाव आहे.काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध आणि पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गेले दीड वर्ष विधानसभेही सोळाही आमदारांनी एकी दाखवली आहे. सर्व १६ आमदार पक्षासोबत असून ही एकी पुढेही कायम राहणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
गोव्यात काँग्रेसचे सर्व १६ आमदार एकसंध, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 7:58 PM