पणजी - गणेश चतुर्थीसाठी गोवा सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसा आदेश महसूल सचिव संजय कुमार यांनी काढला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही. अन्यथा १४ दिवस घरात क्वारंटाइन राहावे लागेल. गोव्यातील अनेक लोक नोकरी, धंद्यानिमित्त परराज्यात आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला ते आपल्या गावी येत असतात.
शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक लोक गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी आहेत त्यांनाही गावी जाणे शक्य होणार नाही. अन्य राज्यांमध्ये सणासाठी जाणाऱ्यांनी गणेश उत्सव आटोपून गोव्यात परतताना एक तर कोविड निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा किंवा आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा अधिक उंचीची असू नये असे बजावले आहे. सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे.
- कंटेनमेंट झोन किंवा कोविडमुळे सील केलेल्या भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला मनाई आहे.- चतुर्थीसाठी बाजारांवर पालिका, पंचायती यांनी देखरेख ठेवावी. गर्दी टाळण्यासाठी बाजाराची वेळ वाढवावी.- चित्रशाळांमध्ये गर्दी करु नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी चित्रशाळेत येऊ नये. तसेच चित्रशाळांनी २0 ऑगस्टपासूनच मूर्ती वितरण सुरु करावे.- गणेश मूर्तीसाठी राज्याची हद्द ओलांडून त्याच दिवशी २४ तासात परत गोव्यात आल्यास अशा व्यक्तीला चाचणी रिपोर्ट किंवा क्वारंटाइनची गरज नाही.- सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे. शक्य तो मंडळांनी आॅनलाइन दर्शनाची सोय करावी. या मंडळांना गणेशोत्सवास परवानगीबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी निर्णय घ्यावा.- सार्वजनिक गणेशमूर्ती बसविण्यासाठी तसेच विसर्जनाला ६ पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही. लोकांनीही एकमेकांच्या घरी जाणे टाळावे.- सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी १0 पेक्षा अधिक गणेशभक्तांनी एकत्र येऊ नये. शारीरीक दुरीचे पालन करावे तसेच तोंडावर मास्क वापरावा.- सायंकाळी ५ ते रात्री १0 या वेळेतच विसर्जन करावे. विसर्जनासाठी पंचायती, पालिकांनी तासातासाच्या नियोजनाने वेळापत्रक तयार करावे.- गणेशमूर्ती नेणाऱ्या वाहनात पाचपेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही.- भटजींनी शारिरीक दुरी तसेच मास्क परिधान वगैरे मार्गदर्शक तत्त्वें पाळावीत.
दहीहंडीस मनाई
येत्या मंगळवारी जन्माष्ठमी असून त्यानिमित्त बुधवारी होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. जन्माष्टमीनिमित्त धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांनाही मनाई आहे. लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊ नये असे बजावण्यात आले आहे.