- किशोर कुबल पणजी - भाजप उमेदवार पल्लवी धेंपे व श्रीपाद नाईक यांनी अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आपापले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दोन्ही ठिकाणी उमेदवारांसोबत अर्ज भरताना उपस्थित होते. श्रीपाद नाईक यांनी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निर्वाचन अधिकारी स्नेहा गीत्ते त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी वरील दोघांसह आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात, प्रवीण आर्लेकर तसेच इतर आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यालयाकडून मिरवणुकीने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत श्रीपाद यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणले.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मडगाव येथे पल्लवी धेंपे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, 'विरोधकांबाबत मला काही बोलायचे नाही. माझा प्रचार सकारात्मक पद्धतीने चालला आहे. काँग्रेसने त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे.' पल्लवी उमेदवारी अर्ज भरताना नागरी पुरवठामंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आदी उपस्थित होते.
... म्हणून उमेदवारी रामनवमीच्यापूर्वसंध्येला : मुख्यमंत्रीदरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजप उमेदवारांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला अर्ज भरण्याचा दिवस का निवडला? असे विचारले असता ते म्हणाले की, 'राम नवमीला आम्हा सर्वांना मंदिरांमध्ये जायचे आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे. म्हणून आमच्या उमेदवारांनी मंगळवारी अर्ज भरले. काँग्रेस हे काही मानत नाही. त्यांनी 'राम सेतू' सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.'