पणजी - जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स आणि आमदार विल्फ्रेड डिसा यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. जलस्रोतमंत्री फिलीप नेरी हे वेळ्ळी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. परंतु नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता ते भाजपा सोडणार आहेत.
भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळ चिन्हावर निवडणुका लढविणे नेरी यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ते आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तसे त्यांनी जाहीरही केले आहे. परंतु, राजीनामा देण्यापूर्वी आपल्या मतदारांना विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले. फिलीप नेरी यांच्या प्रमाणेच काँग्रेस उमेदवारीवर निवडून येऊन भाजपमध्ये गेलेले विल्फ्रेड डिसा यांनीही आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज किंवा गुरुवारी ते आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात.