पणजी : माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड केल्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनीही दंड थोपटले आहेत. तेही बंडाची भाषा करू लागल्याने भाजपच्या गोवा नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला आहे.
येत्या १४ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उत्पल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला. सिद्धेश नाईक यांनी तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवे मतदारसंघात उमेदवारी मागितली होती. भाजपने ती नाकारली. त्यामुळे नाईक भडकले आहेत. भाजपने आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जेनिता मडकईकर यांना कुंभारजुवेत तिकीट दिले. तथापि, जेनिता यांना पराभूत करावे, असे जाहीर आवाहन सिद्धेश नाईक यांनी केले. कार्यकर्त्यांनी सांगितले तर मी अपक्षही लढेन असे सिद्धेश नाईक यांचे म्हणणे आहे.भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात तळ ठोकलेला आहे. त्यांनी सिद्धेश नाईक व अन्य असंतुष्टांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही बंड केले.
मुख्यमंत्र्यांकडूनही झाले समजूत घालण्याचे प्रयत्नमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पार्सेकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या करून पाहिला. पार्सेकर यांनी कडक भूमिका घेत बुधवारी भाजपला प्रत्युत्तर दिले. आपण कुणाच्याच दबावाला भीक घालणार नाही, ज्यांना आपल्याशी बोलायचे आहे त्यांनी समोर यावे व डोळ्यांना डोळे भिडवून बोलावे, असे पार्सेकर म्हणाले.