गोवा : निवडणुकीपूर्वी भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:12 PM2022-01-10T12:12:03+5:302022-01-10T12:13:04+5:30
निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी.
पणजी : भाजपचे गोव्यातील मंत्री मायकल लोबो यांनी अखेर आमदारकी आणि मंत्रीपदाचा राजीनामा सोमवारी सकाळी सादर केला. भाजपसोबत असलेले गेल्या १५ वर्षांचे संबंध तोडत त्यांनी पक्षालाही रामराम केला. राजीनामा देणारे ते भाजपचे पहिले मंत्री ठरले आहेत. तर दुसरीकडे मयेंचे आमदार प्रवीण झांट्ये हेदेखील आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून तेही भाजपला रामराम करतील.
गोव्यात शनिवारी विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी गतिमान झालेल्या आहेत. भाजप सोडण्याचे कारण सांगताना लोबो खेदाने म्हणाले की, "दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा वारसा पक्ष पुढे नेत असल्याचे मला दिसत नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. पक्ष बाहेरील उमेदवार आयात करीत आहे. कळंगुटची जनता माझ्या या निर्णयाचा आदर करेल याची पूर्ण खात्री मला आहे.’
यावेळी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना अजून काही निश्चित केलेले नाही. अन्य पक्षांकडे आपली बोलणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोबो गेला काही काळ भाजप तसेच सावंत सरकारवर नाराज होते. अनेकदा त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. परंतु पक्षाने त्याची दखल घेतली नाही. यातूनच त्यांनी आमदारकी, मंत्रीपदाचा त्याग करत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली.
सावंत सरकारमधून राजीनामा देणारे ते पहिले मंत्री तसेच तर तिसरे आमदार ठरले आहेत. याआधी सत्ताधारी पक्षाच्या आमदार एलिना साल्ढाना व कार्लुस आल्मेदा यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, मयेंत भाजपने मगोपचा उमेदवार उचलला. प्रेमेंद्र शेट यांना भाजपप्रवेश देऊन तिकीट देण्याचे निश्चित केल्याने झांट्ये नाराज होते. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपला रामराम केल्यानंतर ते मगोपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.