पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली. त्यामुळे लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे नऊ राजकीय पक्ष लढतीत असून, सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत.पणजी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला आहे. उत्पल पर्रीकर हे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत. भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने ते बंड करून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी बंडाची भूमिका कायम ठेवत दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
भाजपचे ४० उमेदवार-सत्ताधारी भाजपने सर्व ४०मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेस- गोवा फॉरवर्ड यांची युती असून, काँग्रेसने ३७, तर गोवा फॉरवर्डने ३ उमेदवार दिले आहेत.-आम आदमी पक्षाने ३९ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मगोप-तृणमूल युतीने ३९ उमेदवार दिले आहेत.