Goa Assembly Election 2022: एका पक्षात रमत नाही मन, गोव्यामध्ये पाच वर्षांत तब्बल ६० टक्के आमदारांनी केलं पक्षांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:20 PM2022-01-22T22:20:24+5:302022-01-22T22:20:59+5:30
Goa Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यामध्ये आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केलं आहे. याबाबतची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. गोव्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे २४ आमदारांनी एक पार्टी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
पणजी - गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाच्या कारभाराबाबत असलेली नाराजी, त्यात पारंपरिक काँग्रेस, भाजपा, मगोप यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस, आप, शिवसेना-राष्ट्रवादी हे मैदानात उतरलेले पक्ष आणि उत्पल पर्रिकर यांनी केलेलं बंड यामुळे गोवा विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यामध्ये आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केलं आहे. याबाबतची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.
गोव्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे २४ आमदारांनी एक पार्टी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. एकूण ४० आमदार अलेल्या गोव्यामध्ये याची टक्केवारी ही ६० टक्क्यांपर्यंत जाते. एका संघटनेच्या रिपोर्टमधून ही माहिती देण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, या प्रकरणात गोव्याने एक विचित्र रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ज्याचे भारतीय लोकशाहीमध्ये दुसरे उदाहणरण मिळत नाही. गोव्यामध्ये १४ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, पक्ष सोडणाऱ्या २४ आमदारांच्या यादीमध्ये विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांच्या नावाचा समावेश नाही आहे. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. ते भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच त्यांनी भाजपाच्या उमेदवारकीवर निवडणूक लढवली. २०१९ मध्ये काँग्रेसच्या तब्बल १० आमदारांनी पक्षाची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही समावेश होता.
भाजपामध्ये गेलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये जेनिफर मोन्सेरेट, फ्रान्सिस सिल्वारिया, फिलिप नेरी रॉड्रिग्स, विल्फ्रेड नाजरेथ मेनिनो डीसा, क्लेफसियो डायस, अँटोनियो, कारानो फर्नांडेस, निळकंठ हळर्नकर, इसिडोर फर्नांडिस, बाबुश मोन्सेरात यांचा समावेश होता.
तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार दीपक पावस्कर आणि मनोहर आजगावकर हेही याच काळात भाजपामध्ये दाखल झाले. त्याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्षामधील आमदार जयेश साळगावकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. तर हल्लीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार रवी नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. तर अजून एक माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ मध्ये जिंकलेले चर्चिल आलेमाव यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.