पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पणजीत अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. भाजपा सोडण्याचा निर्णय सर्वात कठीण होता. जर पणजीतून चांगल्या उमेदवाराला पक्षाने तिकीट दिली असती तर मी निवडणूक लढवली नसती असा दावा उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.
भाजपाने पणजीतून उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता विद्यमान आमदार मॉन्सरेट यांना मैदानात उतरवलं आहे. मागील अनेक वर्षापासून पणजीतून मनोहर पर्रिकर यांनी नेतृत्व केले होते. मात्र त्यानंतरच्या पोट निवडणुकीत मॉन्सरेट यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बाजी मारली. कालातरांना मॉन्सरेट यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपानं पणजीतून त्यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे उत्पल पर्रिकर दुखावले गेले. भाजपा नेहमीच मनात राहील अशी खंत त्यांनी बोलून दाखवत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
उत्पल पर्रिकर म्हणाले की, पक्ष सोडणं सर्वात कठीण निर्णय होता. हा निर्णय मला घ्यावा लागणार नाही अशी अपेक्षा होती परंतु मला हा निर्णय करणं भाग पडलं. परंतु कधी कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. जर पणजीतून पक्ष कुठल्या चांगल्या उमेदवाराला उतरवण्याचा निर्णय घेत असेल तर मी माझा निर्णय मागे घेण्यासही तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केले.
“माझ्या वडिलांचे विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत”
त्याचसोबत मला पक्षाने तिकीट दिली नाही ते १९९४ च्या स्थितीसारखं आहे. जेव्हा माझे वडील मनोहर पर्रिकर यांना पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना लोकांचे मोठं समर्थन होते त्यामुळे त्यांना बाहेर करता आलं नाही. आता ते विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत. तर मी जनतेच्या सोबत आहे असंही उत्पल पर्रिकर यांनी खुलासा केला.
उत्पल पर्रिकर यांनी २०१९ च्या पणजी पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजीत पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी लोकांचं समर्थन असतानाही मला तिकीट देण्यात आली नाही. जेव्हा जे. पी नड्डा गोव्यात आले होते तेव्हा ५ दाम्पत्यांनी होणाऱ्या निवडणुकीत तिकीट मागितलं होतं. जर मनोहर पर्रिकर जिवंत असते तर एकाही पुरुष नेत्याने स्वत:च्या पत्नीला तिकीट मागण्याची हिंमत केली नसती असंही त्यांनी सांगितले.