देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. गोव्यात सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. गोव्यातील मतदान एकाच टप्प्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगानं आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. वेळेवर निवडणुका घेणं हेच निवडणूक आयोगाचं काम असल्याचं निवडणूक आयोगानं यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी मतदानासाठी एका तासाचा अधिक कालावधीही देण्यात आला आहे याशिवाय सर्व प्रकारच्या रॅलींवर बंदी धालण्यात आली असून १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची रॅली काढता येणार नसल्याचंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय.
देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार असून यासाठी ५ राज्यांमध्ये ६९० विधानसभा जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. कोरोनाकाळात निवडणुका घेणं हे एक आव्हान आहे, परंतु कोविड सेफ निवडणुका पार पाडणं हा निवडणूक आयोगाचा उद्देश असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी निवडणुकीची एकूण पद्धत कशी असेल याबाबत माहिती दिली. सुशील चंद्र यांच्यासोबत यावेळी अन्य दोन निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे हेदेखील उपस्थित होते. पाच राज्यांमध्ये यावेळी एकूण १८.३४ कोटी मतदार सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये सर्व्हिस मतदातेही सहभागी आहे. यामध्ये ८.५५ कोटी महिला मतदार आहे. तर एकूण २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यापैकी ११.४ लाख महिला पहिल्यांदा मतदान करणार आहे. लोकांना सुविधा व्हावी यासाठी सर्व बुथ यावेळी खालील मजल्यावरच असतील, बुथवर सॅनिटायझर आणि मास्कही उपलब्ध असतील असं निवडणूक आयोगानं सांगितलं. गोवा आणि मणिपुरमध्ये उमेदवारांना खर्चाची मर्यादा २५ लाखांपर्यंत निश्चित असेल. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांबाबत C vigil द्वारे कोणालाही तक्रार नोंदवता येणार आहे. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनची माहितीही घोषित करावी लागणार असल्याचंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.कोविडबाधितांना बॅलेटपेपद्वारे मतदान करता येणारसरकारी कर्मचाऱ्यांशिवाय यावेळी निवडणूक आयोगानं ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना आणि कोविड बाधितांना बॅलेटपेपरद्वारे मतदान करण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय दिव्यांग व्यक्तींनाही पोस्ट बॅलेटची सुविधा उपलब्ध असेल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.कोविडबाधितांच्या घरी टीम जाणारदरम्यान, यावेळी कोविडबाधित मतदारांसाठीही निवडणूक आयोगानं विशेष व्यवस्था केली आहे. कोविडबाधितकिंवा संशयित व्यक्तीच्या घरी निवडणूक आयोगाची व्हिडीओ टीम विशेष व्हॅननं जाणार आहे. तसंच त्यांनाही यावेळी मतदान करता येईल. त्यांना बॅलेट पेपरच्या मदतीनं मतदान करण्याचा अधिकार मिळेल.गोव्यात यावेळी कोणाची सत्ता?४० जागा असलेल्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्चला पूर्ण होत आहे. राज्यात यापूर्वी विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. १५ जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आलं होतं. भाजपनं १३ जागांवर विजय मिळवला होता. परंतु एमजीपी, जीएफपी आणि दोन अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन भाजपनं सरकार स्थापन केलं. मनोहर पर्रिकर यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.
यावेळी भाजप आणि काँग्रेससोबत निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसही उतरले आहे. गोव्यात गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहेत. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डाही पूर्ण ताकदीनीशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही पूर्णपणे ताकदीनीशी उतरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.