Goa Assembly Election 2022 Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी भाजपनं चोरीनं मिळवली होती गोव्याची सत्ता; राहुल गांधींचा भाजपवर टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:31 PM2022-02-11T17:31:20+5:302022-02-11T17:32:53+5:30
Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी गोव्याच्या जनतेनं भाजपला जनमत दिलं नव्हतं, त्यांनी चोरीनं सत्ता मिळवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष (BJP) डबल इंजिन सरकार आणि विकास कामांचे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसलाही (Congress) या निवडणुकीत आपल्याला विजय मिळेल अशी अपेक्षा आहे. गोव्यातील आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच सत्तेत आल्यानंतर त्वरित गोव्यात स्थायी आणि कायदेशीर पद्धतीनं खाणकाम योजना सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
"यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि गोव्यात काँग्रेसचेच सरकार स्थापन व्हावे यासाठी आम्ही तातडीने काम करू," असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी सांगितलं. गोव्यात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. गोव्यातील प्रत्येक तरुणाला येथे नोकऱ्या नाहीत याची कल्पना आहे. पर्यटनाच्या स्थितीबाबतही काय झालंय हे सर्वांनाच माहीत आहे. भाजपने गोव्यात गेली पाच वर्षे जे राज्य केले, ते त्यांनी चोरीच्या माध्यमातून मिळवलं आहे. गोव्यातील जनतेला काँग्रेसला सत्तेवर आणायचे होते, मात्र भाजपने भ्रष्टाचार करून पैसे देऊन येथे सरकार स्थापन केले. भाजपने गेल्या ५ वर्षात एकही विकासकाम केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
We plan to restore mining in a sustainable and legal way in Goa soon after we are voted to power: Congress leader Rahul Gandhi, in Goa pic.twitter.com/KxSDnt5qvw
— ANI (@ANI) February 11, 2022
२०१२ पूर्वी गोव्यात विकास झाला नसल्याचं भाजपनं म्हटलं पण सत्य गोव्यातील जनतेला माहीत आहे. आम्हाला गोव्यातील लोकांचा आवाज ऐकायचा आहे आणि त्यांच्या मताचा आदर करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. इतर पक्षातून येऊन काँग्रेसच्या नावाने जिंकणारे असे लोक आम्हाला नको आहेत असंही गोव्यातील जनतेनं सांगितल्याचं ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या वक्तव्यावरही उत्तर
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं. गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेस सरकारला १५ वर्षे लागल्याचं ते म्हणाले होते. "त्यांना (पंतप्रधान) त्यावेळचा इतिहास समजत नाही," असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. बोलताना त्यांनी हिजाबच्या मुद्द्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. लोकांचे लक्ष विचलित करणाऱ्या अशा संभाषणात मी सहभागी होणार नाही. माझे लक्ष त्यांच्यासाठी (लोकांसाठी) काय महत्त्वाचे आहे यावर असल्याचे राहुल गांधी म्हणाले.