पणजी - देशातील छोट्या राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यामध्ये यावेळच्या विधानसभा निडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, गोव्यातील मतदानप्रक्रिया आटोपल्यावर गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत मिळत आहेत. गोव्यात कुठल्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने काँग्रेस आणि भाजपाने अनेक अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून, सरकार स्थापन करण्यासाठी येथे कुठल्याही पक्षाला २१ जागा जिंकणे आवश्यक आहे.
मात्र सध्या भाजपा आणि काँग्रेस दोन्ही माध्यमांसमोर आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. याबाबत काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, गोव्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील,असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला आपल्या उमेदवारांकडून खूप चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. गोव्यातील जनतेने परिवर्तनाच्या बाजूने मतदान केले आहे. आता आमच्याकडे बहुमतासाठी संख्या कमी पडली तर आम्ही निश्चितपणे समान विचारधारा असलेल्या उमेदवारांची मदत घेऊ. आपण भाजपाविरोधात लढलो होतो, ही बाब अपक्ष उमेदवारांनी लक्षात घेतली पाहिजे. सरकार स्थापन करून ते चालवण्यासाठी आम्हाला सर्वांचा पाठिंबा हवा आहे. काँग्रेस हा असा एकमेवर पक्ष आहे, जो सर्वांचा पाठिंबा घेईल आणि कुठल्याही त्रासाविना सरकार चालवेल.
तर भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा असा एकमेव पक्ष आहे, जो सरकार स्थापन करू शकेल. भाजपाकडे संख्याबळ कमी असलं तरीही भाजपा सरकार स्थापन करेल. एका नेत्याने सांगितले की, २०१७ मध्ये काँग्रेस १७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपाकडे १३ जागा होत्या. तरीही भाजपाने सरकार स्थापन केले होते. सर्व छोटे पक्ष भाजपाच्या समर्थनार्थ पुढे आले होते. भाजपा असा एकमेव पक्ष आहे, जो स्थिर सरकार चालवू शकतो.
त्यांनी पुढे सांगितले की, गोवा हे एक छोटे राज्य आहे. तसेच त्याला केंद्राच्या मदतीची आवश्यकता आहे. भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. त्यामुळे गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होणे हे गोव्यातील जनतेसाठी फायदेशीर ठरेल.