पणजी : भाजपविरोधी महाआघाडी करण्यासाठी तृणमूलने पुढे केलेला मैत्रिचा हात काँग्रेसने नाकारला आहे. एकत्र येण्याऐवजी तृणमूल व काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस व तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये या मुद्यावरून चांगलीच जुंपली आहे.
भाजपविरोधी महाआघाडीच्या मुद्यावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षात सध्या युद्ध सुरू आहे आणि तेही अगदी वरिष्ठ पातळीवर. तृणमूलच्या गोवा प्रभारी माहुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी काँग्रेसला महाआघाडीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून महाआघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टत टोलविला होता. त्यांच्या या कथित प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेसचे केंद्रीय नेते के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस पक्ष हा सत्ता मिळविण्यास सक्षम असल्याचे सांगत महाआघाडीच्या मुद्यावर पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्टीकरणानंतर खुद्द काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनीही ट्वीट करून खुलासा केला आहे. तृणमूल नेत्या मोहुआ मोईत्रा या दिल्लीत कुणाकडून प्रतिसाद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबद्दल गुंडूराव यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपविरुद्ध महाआघाडी स्थापन करण्याच्या गोष्टी करतानाच काँग्रेस कमकुवत करून भाजपविरोधी मतांचे विभाजन करीत आहेत. हे कुणाच्या फायद्यासाठी करीत आहेत, असा प्रश्न गुंडूराव यांनी मोईत्रा यांना केला आहे. दरम्यान, तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव यांनी गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही सरकार का स्थापन केले नाही? असा प्रश्न विचारत पी. चिदंबरम यांनी उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.
बुडणारे एकत्र : मावीनराज्यात भाजप विरोधकांची कथित महाआघाडीसाठी चालू असलेली धडपड म्हणजे बुडणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन बचावासाठी चालविलेेल प्रयत्न आहे, अशी टिका मंत्री माविन गुदिन्हो यांनी महाआघाडीची खिल्ली उडविली. महागठबंधन किंवा महाआघाडी हा तसलाच प्रकार आहे’ असे ते म्हणाले. कुठ्ठाळी मतदारसंघात माविन यांचे समर्थक गिरीश पिल्ले यांच्या नावाचा उमेदवारीसाठी करण्यात आलेल्या शिफारशीविषयी त्या उमेदवाराच्या गोंयकारपणाबद्दल प्रश्न केला असता ते म्हणाले की, ‘गोव्यात बाहेरचा आणि आतील असा फरक करता येणार नाही. पिल्ले यांचे कुुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राहते. कायद्याने ते गोमंतकीय आहेत’ असे गुदिन्हो म्हणाले.
पक्षांतर उठले मुळावरतृणमूल काँग्रेस गोव्यात एका बाजूने भाजपविरोधी महाआघाडी स्थापन करण्याची भाषा करतानाच दुसऱ्या बाजूने काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. भाजपमधून बाहेर पडलेले माजी मंत्री आणि कळंगूटचे माजी आमदार मायकल लोबो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर नाराज झालेले जोसेफ सिक्वेरा कळंगूटचे इतर स्थानिक नेते व कार्यकर्ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे भाजपविरोधी एकत्र येण्याऐवजी या दोन्ही पक्षांतील दुही अधिक विस्तारताना दिसत आहे.
पवार, राऊत यांचे प्रयत्नराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील गोव्यात भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याबाबत त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना सूचनाही दिल्या होत्या. मात्र, काँग्रेस व तृणमूलमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपावरून महाआघाडीची आशा मावळली आहे.
महाआघाडी नकोचगोवा फाॅरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी महाआघाडी स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, युती असलेल्या काँग्रेस नेत्यांनी याला पाठिंबा दिला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह इतर नेत्यांनी तृणमूलसोबत महाआघाडी स्थापन करण्यास विरोध दर्शवला आहे.