गोवा - पणजीची निवडणूक जशी उत्पलला सोपी नाही, तशी ती बाबूशलादेखील सहज नाही. राजधानीत निवडणूक एकतर्फी नक्कीच नाही. हिंदू बहुजन समाजाची जास्त मते उत्पल जर मिळवू शकले तर निकाल इंटरेस्टिंग असेल...
मनोहर पर्रीकर पहिल्यांदा पणजीचे आमदार झाले तेव्हा ३९ वर्षांचे होते. त्यावेळी पर्रीकर पणजीसाठी पूर्णपणे बाहेरचे होते. ते पणजीचे नागरिक नव्हते. आता उत्पल हे पणजीवासियांना भायले वाटण्याचा प्रश्नच येत नाही. उत्पलचे वय ४१ वर्षे आहे. म्हणजे मनोहर पर्रीकर १९९४ साली आमदार झाले तेव्हा पर्रीकर यांचे वय जेवढे होते, त्याहून दोन वर्षे अधिक आता उत्पलला झालेली आहेत. उत्पल व बाबूश दोघेही ताळगाव मतदारसंघात निवास करतात. ९४ साली मनोहर पर्रीकर यांना पणजी मतदारसंघ पूर्णपणे ठाऊक नव्हता. कारण निवडणुकीपूर्वी काही वर्षे पूर्ण पणजी मतदारसंघात फिरण्याचा प्रश्नच आला नव्हता. उत्पलला पणजी मतदारसंघ त्या तुलनेत जास्त ठाऊक आहे. उत्पल जरी पणजीत आता पहिल्यांदा लढत असला, तरी पणजीतील भाजप कार्यकर्ते किंवा पणजी मतदारसंघ उत्पलला मुळीच नवा नाही. मनोहर पर्रीकर उच्चशिक्षित सारस्वत म्हणून पणजीतील मतदारांनी त्यांना स्वीकारले होते. उत्पलकडेही या दोन्ही बाजू आहेत. पणजीत बहुजन समाजातील मते नऊ हजार आहेत. त्यापैकी अनेकजण भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. ९९ सालापर्यंत पणजीत काँग्रेसला देखील सारस्वत मते मोठ्या संख्येने मिळत होती. म्हणूनच काँग्रेस पक्ष कधी केशव प्रभू, कधी रमेश सिलिमखान यांना पणजीत तिकीट देत होता. मात्र २००२ सालापासून ९० टक्के सारस्वत मते मनोहर पर्रीकर यांनाच मिळू लागली. कारण पर्रीकर तोपर्यंत मुख्यमंत्री झाले होते व त्यांचा प्रभाव उच्चभ्रू वर्गाला कळला होता. या मतांना दिनार तारकर यांनी २००७ साली सुरूंग लावला होता. सारस्वत मते तेव्हा फुटली होती. पर्रीकर तेव्हाच पराभूत झाले असते, पण बाबूश मोन्सेरात यांनी तेव्हा पर्रीकर यांना मदतीचा हात दिला. बाबूशने पणजीतील आपल्या सर्व नगरसेवकांना २००७ साली बजावले होते, की सर्वांनी पर्रीकरांसाठी काम करून भाईंना मते द्यावीत. दिनार तारकर निवडून येऊ नयेत हा बाबूशचा हेतू होताच, शिवाय पर्रीकर पणजीत जिंकावे व आपण भाजपच्या अडथळ्यांविना ताळगावमध्ये जिंकावे असे बाबूशचे गणित होते. तत्पूर्वी अगदी दोनच वर्षे म्हणजे २००५ साली बाबूशने पर्रीकरांचे सरकार पाडले होते. मात्र ती कटुता फक्त वर्षभरच टिकली. बाबूश व पर्रीकर यांच्यातील शत्रूत्व कधीच जास्त दिवस टिकले नाही.
ताळगाव व पणजी हे एकमेकांचे शेजारील मतदारसंघ. वाघ व सिंह एकाच अभयारण्यात असतात तेव्हा ते एकमेकांच्या वाटेला जात नाहीत. एकमेकांवर हल्ला करत नाहीत. बाबूश व पर्रीकर यांचे नाते हे तसे राहिले, दोघांनीही एकमेकांवर हल्ला न करण्याचे पथ्य कायम पाळले. अनेक वाचकांना ठाऊक नसेल पण बाबूश जेव्हा जेव्हा अडचणीत यायचे, तेव्हा ते पहिला फोन त्यावेळी विजय सरदेसाई व मनोहर पर्रीकर या दोघांनाच करायचे. बाबूशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद झाला तेव्हा पर्रीकर संरक्षणमंत्री होते. त्यावेळी पहिला फोन बाबूशने मनोहर पर्रीकर यांनाच केला होता. केवळ हे सांगण्यासाठी, की भाजपचीच ताळगावमधील माणसे आपल्याला या प्रकरणात अडकवत आहेत. पर्रीकर यांनी आपण काय ते पाहून घेतो एवढेच बाबूशला सांगितले व फोन स्वीच ऑफ केला. बाबूशला राजकीयदृष्ट्या संपविण्याची हीच योग्य वेळ, असा विचार कदाचित पर्रीकर यांनी तेव्हा केला होता; पण बाबूश संपला नाही. तो पणजीत भाजपच्याच माध्यमातून नवा अवतार घेऊन आला. आज बाबूश पणजीतील भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. पणजीतील धनिक, उद्योजक व व्यापारी हे उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. त्यांनी बाबूशला कोपरापासून नमस्कार केलाय. मात्र एक गोष्ट नमूद करावीच लागेल, की पणजीत जे भावनिक वातावरण उत्पलने तयार केलेय, त्यातून काहीही निकाल लागू शकतो. उत्पलला मत देणे म्हणजे पर्रीकरांना मत देणे, पणजीच्या भाईला मत देणे अशा प्रकारची भावना महिला व पुरुष मतदारांमध्ये आहे. निवडणूक जशी उत्पलला सोपी नाही, तशी ती बाबूशलादेखील सोपी नाही. पणजीतली निवडणूक एकतर्फी नक्कीच नाही. उदय मडकईकर यांना जर काँग्रेसने तिकीट दिले असते, तर कदाचित बाबूश व उत्पलमधील भांडणाचा लाभ काँग्रेसलादेखील होऊ शकला असता. बाबूशची स्वत:ची हक्काची मते पणजीत आहेत, हे मान्य करावेच लागेल. समजा बाबूशला भाजपने तिकीट दिले नसते तर बाबूशकडे अपक्ष राहूनही सहा हजार मते प्राप्त करण्याची क्षमता होती.
एक लक्षात घ्यायला हवे, की मनोहर पर्रीकर यांना बाबूशविषयी प्रेम नव्हते. पण राजकीय अपरिहार्यता म्हणून बाबूशशी त्यांनी चांगले संबंध ठेवले होते. तुम्ही ताळगावमध्ये बाबूशविरुद्ध प्रचाराला कधी जात नाही, असे निवडणुकीवेळी आम्ही काही पत्रकार हळूच खासगीत पर्रीकर यांना म्हणत होतो. तेव्हा मी भाजपचे नेतृत्व करतो, मी सीएमपदाचा उमेदवार, मीच जर पणजीत हरलो तर काय होईल? मला पणजीतील माझ्या प्रचारात जास्त अडकून न पडता पूर्ण गोवाभर फिरायचे असते, ताळगाव आम्ही एरवीसुद्धा जिंकणारच नाही, असे खरे उत्तर पर्रीकर खासगीत द्यायचे. हे छापण्यासाठी नव्हे हां, असेही ते सांगायचे. आपल्या मृत्यूनंतर आपला मुलगा बाबूशविरुद्ध पणजीत लढणार व त्यासाठी त्याला भाजप सोडावा लागणार, असा विचार मनोहर पर्रीकर यांनी कधी केलाच नसेल. उत्पल सांगतो ती एक गोष्ट खरीच. आपण पर्रीकर यांचा पुत्र असल्यानेच पणजीत बाबूश प्रवृत्तीला टक्कर देण्यासाठी पुढे आलो. आपण आपले सगळे राजकीय भवितव्य डावावर लावतोय. बाबूशला हरवायचे आहे, हे उत्पलचे विधान प्रामाणिक वाटते. बाबूश सर्वबाबतीत बलाढ्य उमेदवार हे ठाऊक असूनही त्याला टक्कर देऊया असा विचार ४१ वर्षीय उत्पलने करणे व त्यासाठी भाजप सोडणे ही घटना मोठी आहे. तत्त्वांची बाजू घेतो, त्याला पराभवाची भीती नसते.
बाबूश कधीच पराभूत झाला नाही का? झालाय. पणजीत बाबूश स्वत: पराभूत झाला होता व जेनिफर मोन्सेरात सांताक्रुझमध्ये पराभूत झाल्या होत्या. बाबूशला जेनिफरचा तो पराभव जास्त जिव्हारी लागला होता. कारण बाबूशच्या कुटुंबातील कुणी निवडणुकीत हरू शकतो, ही कल्पनाच बाबूशला सहन झाली नव्हती. मी स्वत: त्यावेळी बाबूशला पराभवाविषयी विचारले होते. तेव्हा सांताक्रुझमध्ये आपले मॅनेजमेन्ट थोडे चुकले, असे सांगून बाबूशने बरेच काही सूचित केले होते. बाबूशने ज्या प्रमुख कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला होता, त्यांनी जेनिफरच्या प्रचाराचे काम त्यावेळी नीट केले नव्हते. बाबूश जेव्हा पणजीत हरला होता, तेव्हा पंधरा-वीस दिवस दु:खी वातावरणातच होता. तो कुणाचे फोनच घेत नव्हता. पणजीतील मुस्लिम बांधवांची मते तुम्हाला मिळाली नाहीत, म्हणून तुम्ही हरला असे मी त्यावेळी पत्रकार या नात्याने सांगताच बाबूशने ऑफ दी रेकॉर्ड दिलेली माहिती इंटरेस्टिंग होती. एक-दोन विश्वासू नगरसेवकांनीच तेव्हा बाबूशचा पत्ता कापला होता. आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही कशावरून? अर्थात आता स्थिती वेगळी आहे. बाबूशने महापालिका निवडणुकीत आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणलेले आहेत. उत्पल अपक्ष आहे हा प्लस पॉईंट आहे. काँग्रेसवाले, ख्रिस्ती मतदार व भाजपचे मतदार असे तीन घटक उत्पलला मत देऊ शकतात.
आता बाबूशचे प्लस पॉईंट पाहूया. बाबूशने पणजीत अनेकांना नोकऱ्या दिल्या. पाच वर्षांपूर्वी बाबूशकडे पणजीत जेवढे कार्यकर्ते होते, त्याहून तीनपट जास्त कार्यकर्ते आता बाबूशकडे आहेत. जिथे निधी खर्च करायला हवा, तिथे तो खर्च करून बाबूश आपले स्थान बळकट करील, पण उत्पलकडे पर्रीकरांचा वारसा आहे. मनोहर पर्रीकर स्वत: पणजीत कधीच हरले नव्हते. पणजीतील मतदारांनी जर चला उत्पललाच मत देऊया असा विचार केला तर बाबूशची वाट निसरडी होईल. अर्थात हे सगळे सोपे नाही पण अशक्यही नाही. शेवटी बाबूश हा निवडणूक म्हणजे युद्धासारखी घेत असतो. जिंकू किंवा मरू अशा पद्धतीने तो लढत असतो. तो सर्वांनाच नमस्कार करून निवडणुकीच्या दिवसांत तरी नम्र होत असतो. मात्र यावेळी पर्रीकरविरुद्ध भाजप अशी लढत इंटरेस्टिंग आहे एवढे नक्की.
स्वत: मनोहर पर्रीकर पणजीत जास्त मतांच्या फरकाने कधी जिंकत नव्हते. २००२ साली पर्रीकर १ हजार ३०० मतांच्या फरकाने जिंकले होते. २००७ साली ते १ हजार ४४४ मतांनी जिंकले होते. २०१२ च्या लाटेत पर्रीकर सर्वाधिक म्हणजे ६ हजार मतांनी जिंकले होते. त्यावेळी यतीन पारेख यांना पणजीतील काँग्रेसच्या मतदारांनीही स्वीकारले नव्हते. रायबंदर, मळा, बोक द व्हाक-देऊळवाडा व सांतइनेज येथे बहुजन समाजातील नऊ हजार मतदार राहतात. त्यातील बहुसंख्य मते बाबूशने आपल्या प्रभावाखाली आणलेली आहेत. उत्पल बाबूशच्या त्या व्होट बँकेला सुरूंग लावू शकेल काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. स्थिती खूप कठीण आहे, अशक्य नाही एवढेच तूर्त म्हणूया. बहुसंख्य महिलांची मते उत्पलला मिळू शकतील, पण बाबूशने युवा मतदाराला आपल्याबाजूने वळवलेले आहे हे मान्य करावे लागेल.