पणजी - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात यावेळी विधासभेची निवडणूक चांगलीच रंगली. त्यातच सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस, मगोप या प्रमुख पक्षांसह आप, तृणमूल काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनेक प्रमुख नेते अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने गोव्यातील विधानसभा चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, काल गोवा विधानसभेसाठी तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने आता गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार की राज्यात सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. दरम्यान, वाढलेले मतदान म्हणजे राज्यातील सत्ताधारी भाजपाविरोधातील लाट असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोव्यामधील दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोव्यामध्ये ७८ टक्के मतदान झाले. तर उत्तर गोव्यामध्ये ७९ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक ८९.६१ टक्के मतदान हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाले. प्रमोद सावंत २०१२ आणि २०१७ मध्ये येथून निवडणूक जिंकले होते. तर गोव्यात सर्वात कमी ७०.२ टक्के मतदान हे बेनोलिम मतदारसंघात झाले.
या मोठ्या प्रमाणावरील मतदानामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. एकंदरित चित्र पाहता भाजपाविरोधातील मतदानाची विरोधी पक्षांमध्ये विभागणी न होता ती एकगठ्ठा काँग्रेसकडे गेल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.
दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठ्या प्रमाणावरील मतदान हे भाजपा सरकारच्या समर्थनार्थ झालेले आहे, असा दावा केला आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता सत्ताधारी भाजपाविरोधात अनेक पक्ष रिंगणात असल्याने या पक्षांमध्ये मतांची विभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. पण तशी विभागणी न झाल्यास त्याचा फटका भाजपाला बसू शकतो आणि कांग्रेस भाजपाला आव्हान देऊ शकतो.
भाजपा आणि काँग्रेससोबतच आप, तृणमूल काँग्रेस आणि काही अपक्षही या निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० मार्चला लागणाऱ्या निकालात कुठल्या एका पक्षाला बहुमत मिळणार की, त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वधारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.