पणजी - भाजपाने पणजीतून उमेदवारी नाकारल्यावर भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रिकर यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार बाबुश मोन्सेरात यांना कडवी टक्कर दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच पुन्हा भाजपात जाणार का? या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले आहे.
उत्पल पर्रिकर म्हणाले की, पणजीमध्ये माझ्या विचारांनी जी मतं मिळवण्यात मी यशस्वी झालो. तीच मतं माझ्यासोबत आहेत. जर केवळ चिन्हाचा विचार केला तर तुम्ही मी कुठे असतो हा विचार करा. पणजीत सगळ्यांनी जेवढा पाठिंबा दिला. जवळपास जिंकणाऱ्या उमेदवाराएववढाच पाठिंबा मला मिळाला. त्यामुळे पणजीचे विषय विधानसभेतच मांडायचे असतात असं कुणी सांगितलंय, मी ते बाहेरही मांडू शकतो, असे उत्पल पर्रिकर म्हणाले.दरम्यान, माझ्यासाठी आमदार व्हायचं हा मुद्दा कधीच नव्हता. तसेच देवेंद्र फडणवीसांकडून मला जो पर्याय दिला गेला होता. तिथे भाजपा जिंकला नाही.
तर तिसऱ्या स्थानी राहिला, असाही मुद्दा उत्पल पर्रिकर यांनी इथे मांडला. ते पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे पक्ष आणि कौटुंबिक नातं आहे हे मी नाकारलेलं नाही. मात्र पुन्हा पक्षात जाणं हा तांत्रिक मुद्दा आहे. माझा भावनात्मक मुद्दा आणि बाकी सर्व तुम्हाला माहितच आहे. तो हळुहळू सुटेल. असे उत्पल पर्रिकर म्हणाले.
पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या उत्पल पर्रिकर यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. उत्पल पर्रिकर यांना ६ हजार ७१ मते मिळाली होती. तर भाजपा उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना ६ हजार ७८७ मते मिळाली होती.