पणजी - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीनंतर निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. दरम्यान, गोव्यामध्ये त्रिशंकू निकालाचे दावे करण्यात येत असताना तिथे भाजपाने स्पष्ट बहुमतापर्यंत मजल मारली आहे. भाजपाने एकूण २० जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, भाजपाला आता अजून काही आमदारांचा पाठिंबा मिळू लागला आहे. भाजपाला गोव्यात पाठिंबा देणाऱ्या एकूण आमदारांचा आकडा आता गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही गोव्यात २० जागा जिंकल्या आहेत. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. तसेच तीन अपक्ष आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आमच्याकडे २०+३+2 असा एकूण २५ आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच अजून काही आमदार आम्हाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात बहुमतासह सरकार स्थापन करणार आहोत.
दरम्यान, गोव्यामध्ये भाजपाने २० जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने ११ जागा जिंकल्या आहेत. मगो पक्ष आणि आपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. इतरांना ३ जागा मिळाल्या आहेत.