यावेळी अजिबात रिस्क घ्यायची नाही! काँग्रेसनं राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली; सत्तेचा विश्वास
पणजी: सुरुवातीच्या कलांमध्ये गोव्यात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची चिंता वाढली आहे. सुरुवातीचे कल हाती येताच गोवा काँग्रेसनं राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
काँग्रेस पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांच्या भेटीसाठी दुपारी ३ ची वेळ मागितली आहे. मात्र अद्याप तरी त्यांना राजभवनाकडून भेटीची वेळ देण्यात आलेली नाही. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. २०१७ च्या चुका टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे.
२०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा जुळवण्यात त्यांना अपयश आलं. भाजपनं कमी जागा जिंकूनही लहान पक्षांची मदत घेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं. महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मदतीनं भाजपनं बहुमताचा दावा केला. त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार आलं.
गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता काँग्रेसनं यंदा आपल्या महत्त्वाच्या नेत्यांना सक्रीय केलं आहे. पी. चिदंबरम, डी. के. शिवकुमार गोव्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. छोट्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. एक्झिट पोलचे आकडे पाहून काँग्रेस नेत्यांनी मगोपशी बातचीत सुरू केली आहे. गोव्यात लहान पक्ष किंगमेकर ठरण्याची दाट शक्यता आहे.