Goa Assembly Elections: सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. यात गोव्याच्याही निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या नावाची खुप चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या पणजी सीटवरील (Panjim Assembly Constituency) उमेदवार मागे घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं उत्पल पर्रीकर यांनी पणजीहून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अन्य पक्षांनी त्यांना पाठींबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. संजय राऊत यांनी पणजीमधून शिवसेनेचा उमेदवार मागे घेण्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील टॅग केलंय.