पणजी - गेल्या दहा वर्षांपासून गोव्याच्या सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, काँग्रेस गोव्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसची उमेदवारांची तिसरी यादी आज प्रसिद्ध झाली असून, भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मायकेल लोबो यांना काँग्रेसने कळंगुट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या तिसऱ्या यादीमध्ये एकूण ९ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये बिचोलीममधून मेघश्याम राऊत, थिवी येथून अमन लोटलीकर, कळंगुटमधून मायकेल लोबो, पर्वरी येथून विकास प्रभू-देसाई, सेंट आंद्रे येथून अँथोनी एल फर्नांडिस, साकोलिम येथून धर्मेश सागलानी, मार्केममधून लवू मामलेकर, संगूम येथून प्रसाद गावकर, काणकोणमधून जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गोव्यामध्ये २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र नंतर काँग्रेसमध्ये फूट पडून अनेक आमदार भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान असेल. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून, १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.