पणजी : गाेव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी नाकारली असून, काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या विश्वजित राणे पती-पत्नीला उमेदवारी दिली आहे. गाेवा विधानसभेसाठी गुरुवारी दिल्लीत ३४ मतदार संघांतील उमेदवारांची घाेषणा करण्यात आली. यात दाेन महिलांचा समावेश आहे.ही यादी गाेव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस व भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. भाजपच्या या यादीत ९ अल्पसंख्याक, ३ अनुसूचित जमाती, १ अनुसूचित जाती व ११ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असल्याचे अरुण सिंग यांनी यावेळी सांगितले. दिवंगत मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचे अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या परंपरागत जागेवर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी दावा केला हाेता. परंतु, भाजपने अपेक्षेप्रमाणे हा दावा फेटाळून तेथे अँटाेनासिओ माॅन्सेरट्टे यांना उमेदवारी दिली.काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या विश्वजित राणे या दाम्पत्याला उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री सांकेलिममधून गाेव्याचे मुख्यमंत्री प्रमाेद सावंत हे सांकेलिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना पाेंडातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री मनाेहर अडगावकर मडगावमधून नशीब आजमावणार आहेत.
Goa Assembly Election: पर्रीकरपुत्राला तिकीट देण्यास नकार; काँग्रेसमधून आलेल्या राणे पती-पत्नींवर भाजप मेहेरबान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:15 AM