Goa Assembly Election: आमच्याकडे दोन्ही पर्याय खुले! 'या' छोट्या पक्षानं गोव्यात भाजप, काँग्रेसचे टेन्शन वाढवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:58 PM2022-03-08T18:58:37+5:302022-03-08T18:59:11+5:30
Goa Assembly Election: गोव्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता; काँग्रेस, भाजप लागले कामाला
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीला निकाल परवा जाहीर होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही कोणत्याच पक्षाला गोव्यात बहुमत मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलमधून तशी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे गोव्यात लहान पक्षांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काँग्रेस, भाजपनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजप, काँग्रेसला गोव्यात बहुमत मिळणार नाही, असा अनेक एक्झिट पोल्सचा अंदाज आहे. या दोन्ही पक्षांच्या खालोखाल जागा महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला मिळतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे मगोप किंगमेकर ठरू शकतो. त्यामुळे मगोपला गळाला लावण्यासाठी भाजप, काँग्रेसनं चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम गोव्यात आहेत. त्यांनी मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली आहे.
काँग्रेसच्या नवीन आमदारांची जबाबदारी महाराष्ट्रातील नेते सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय कर्नाटकमधील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते डी. शिवकुमारदेखील गोव्यातील स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. भाजप पुन्हा प्रमोद सावंत यांनाच मुख्यमंत्री करणार असेल, तर आपण त्यांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका ढवळीकर यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते ढवळीकरांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.
मगोपचे नेते सुदिन ढवळीकर सध्या काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी दोन्ही पर्याय खुले ठेवले आहेत. मगोपनं तृणमूल काँग्रेस पक्षासोबत युती करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे गोव्यातील सत्ता स्थापनेत तृणमूलची भूमिकादेखील महत्त्वाची ठरू शकते.
गोव्यात कोणाला किती जागा? (एबीपी-सी व्होटरचा एक्झिट पोल)
काँग्रेस- १२ ते १६
भाजप- १३ ते १७
मगोप- ५ ते ९
आप- १ ते ५