गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका शक्य : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 10:44 PM2019-02-07T22:44:57+5:302019-02-07T22:47:29+5:30
ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचा सत्कार सोहळा : मुक्त कंठाने गौरव
पणजी : गोवा विधानसभा बरखास्त होऊन लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका येथे होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केला. चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचा वयाची ८0 वर्षे पूर्ण केल्याबद्दल ह्द्य सत्कार करण्यात आला. राणे हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार काढताना चव्हाण म्हणाले की, राणे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दित राज्याचा संतुलित विकास केला. राणे यांनी वयाची शतकपूर्ती करावी, अशी इच्छा याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.
येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात प्रदेश काँग्रेस समितीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव अमित देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, ‘आणखी केवळ तीन वर्षांनी राणे हे आमदारकीची ५0 वर्षे पूर्ण करतील. परंतु गोव्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता हे शक्य होईल असे मला वाटत नाही. विधानसभा बरखास्त करुन नव्याने निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे आणि हा विक्रम करण्यासाठी राणे यांना पुन: निवडणूक लढवावी लागेल.’
चव्हाण यांच्या हस्ते राणे यांना मानपत्र, शाल, श्रीफळ, समई प्रदान करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भला मोठा फुलांचा हारही त्यांना घालण्यात आला. सौ. विजयादेवी राणे यांची ओटी भरुन सन्मान करण्यात आला.
‘युवा पिढी शेतीपासून दूर हे चिंताजनक’
सत्काराला उत्तर देताना राणे यांनी आजची युवा पिढी शेतीपासून दूर जात असल्याने व नोकºयांच्या मागे लागल्याने खंत व्यक्त केली. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी पडीक आहेत. कोणताही धंदा व्यवसाय करा, परंतु तो प्रामाणिकपणे करा, असा सल्ला त्यानी दिला. खाणबंदीच्या संकटाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘४0 हजार कुटुंबाची उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झालेली आहे. गोव्यात पर्यायी उद्योगही नाहीत त्यामुळे खाणी लवकरात लवकर सुरु करणे आवश्यक आहे त्यासाठी कायदादुरुस्ती किंवा अन्य ज्या काही गोष्टी करायला हव्यात त्या तातडीने कराव्यात कारण लोक अजून तरी शांत आहेत. पुढचे सांगता येणार नाही. सरकारने यावर विनाविलंब तोडगा काढावा.
बरखास्तीची शक्यता राणेंनी फेटाळली
राणे यांनी भाषणात विधानसभा बरखास्तीची किंवा विसर्जनाची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, ही विधानसभा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. गेली ४७ वर्षे आमदारकीच्या कारकिर्दित सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे धन्यवाद मानले. सुदृढ राहण्यासाठी रोज व्यायाम करा, असा सल्लाही त्यांनी युवा पिढीला दिला.
महाराष्ट्रातही सत्कार व्हावा : अमित देशमुख
अमित देशमुख म्हणाले की, ‘सलग ४७ वर्षे आमदारकीचा राणे यांचा विक्रम देशातच नव्हे तर जगात कोणी केलेला नसेल. खलप हे राणेंचे बोट धरुन विधानसभेत गेले होते. आता विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि लोकसभा निवडणुकही तोंडावर आहे. राणे हे खलपांना आता बोट धरुन लोकसभेत नेतात की विधानसभेत पाहू. ते म्हणाले की, राणे यांचे गोव्यावर नितांत प्रेम आहे त्यामुळे केंद्रात बोलावूनही ते गेले नाहीत.’ राणे यांनी महाराष्ट्राशी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा सत्कार व्हावा, अशी इच्छा देशमुख यांनी व्यक्त केली.