Goa Assembly Result: गोवा विधानसभा निवडणुकीत प्राथमिक कल पाहता ४० पैकी १९ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये सर्वांचा सूपडासाफ करत सर्वात मोठा ठरलेल्या 'आप' पक्षानं गोव्यातही खातं उघडलं आहे. गोव्यात आम आदमी पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत आणि यांची दखल खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही घेतली आहे. केजरीवालांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गोव्यात कॅप्टन व्हेंझी व्हिएगास आणि क्रूझ सिल्वा या 'आप'च्या दोन उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे. बाणावली मतदार संघातून कॅप्टन व्हेंझी व्हिएगास यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या चर्चिल अलेमाओ यांचा पराभव केला. तर वेलीम मतदार संघातून 'आप'च्या क्रूझ सिल्वा यांनी काँग्रेस, भाजपा आणि तृणमूलच्या उमेदवारांविरुद्ध चढाओढीच्या लढाईत बाजी मारली. क्रूझ सिल्वा यांना ५२७९ मतं पडली. तर काँग्रेसच्या सॅव्हिओ डीसिल्वा यांना ५,०६७ मतं पडली आहेत. तृणमूलच्या बेन्जामिन सिल्वा यांना ४,०३० मतं मिळाली आहेत.
गोव्यात आपचे दोन उमेदवार विजयी झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. "आपनं गोव्यात दोन जागा जिंकल्या आहेत. कॅप्टन व्हॅन्झी आणि क्रूझ सिल्वा यांचे खूप खूप अभिनंदन. गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची ही सुरुवात ठरेल", असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.