उसगाव : ‘व्हॅलेंनटाईन डे’च्याच दिवशी एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका युवकाने सकाळी कामावर जाणाऱ्या युवतीवर बियरच्या बाटलीने प्राणघातक हल्ला केला. या प्रकारात मयुरी महादेव वायंगणकर (वय २२, रा. तिराळ-उसगाव) हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिच्यावर तिस्क उसगाव (पिळये) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. पुढील वैद्यकीय उपचारासाठी तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित मंथन मंगेश गावडे ( वय २४ वर्षे , राहणारा पालवाडा उसगाव ) याला पोलिसांनी दीड तासात ताब्यात घेतले.
घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी वायंगणकर ही युवती नेहमीप्रमाणे सकाळी कल्लभ-उडीवाडा येथे असलेल्या अळंबी उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीत गोसावीवाडा-उसगाव मार्गे पायवाटेने चालक जात होती. गोसावीवाडा येथील भारत गॅस गोदामामागे झाडीत दडून बसलेल्या मंथन मंगेश गावडेने अचानक बाहेर येवून मयुरीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मयुरीने प्रतिकार करताच तिथे पडलेल्या रिकाम्या बियरच्या बाटलीने जोरदार प्रहार केला. तसेच तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी एक शेतकरी गुरे चरण्यासाठी घेवून येत होता. त्याला पाहून मंथन पळून गेला. मयुरी काही वेळ तिथेच जखमी अवस्थेत बसून राहिली. नंतर रक्ताळलेल्या अवस्थेत ती कशीबशी चालत फोंडा - वाळपई मार्गाबाजूला असलेल्या प्रभुदेसाई स्मशानभूमीजवळ आली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी तेथून जाणाऱ्या गृहरक्षक विनोद गावस यांनी तिला पाहिले. तातडीने १०८ रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. तेथून जात असलेल्या पोलिस कर्मचारी आशीर्वाद प्रभू यांनी तिची चवकशी केली. दरम्यान, मयुरीचे कुटुंबीयही घटनास्थळी आले.
तिराळ भागाचे पंच राजेंद्र नाईक आपल्या कारने मयुरीला तिस्क उसगाव (पिळये ) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथून तिला गोमेकॉत दाखल केले. हल्ल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंथनला पोलिसांनी दीड तासात ताब्यात घेतले. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी मंथन गावडेने युवकाने आपल्या प्रेमाला नकार देत असल्याबद्दल मयुरीला तिच्या घरी जावून मारहाण केली होती. त्यावेळी मयुरीच्या नातेवाईकांनी तिस्क - उसगाव पोलिस चौकीवर रीतसर तक्रार दिली होती. पुन्हा मयुरीच्या वाटेला जाणार नाही, असे त्यावेळी मंथन गावडेने लिहून दिले होते, अशी माहिती मयुरीच्या आई व मामाने दिली.