लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर गोव्याच्या 'सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स'ने फटाक्यांवर निर्बंध जारी केले आहेत. चतुर्थी काळात रात्री ८ ते १० असे दोन तास फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर फटाके फोडण्यासंदर्भात कडक निर्देश जारी केले होते. असा प्रकार घडल्यास त्या भागाचे पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस स्थानकाचे अधिकारी जबाबदार राहतील, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे पोलिस कारवाई करु शकतात. सर्वोच्च न्यायालयाने नाताळ, नववर्ष स्वागताच्या काळात मध्यरात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार आता गणेश चतुर्थी दिवाळीतही फटाके वापरण्यावर निर्बंध घातले आहेत.
का घातली बंदी
फटाक्यांमध्ये बेरियम नावाची ज्वालाग्रही रासायनिक पावडर वापरली जाते. यामुळे हवा प्रदूषण होते व आरोग्यावर घातक परिणाम होतात. कानठळ्या बसवणाया फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी, भटके प्राणी घाबरतात. वृद्ध आणि आजारी लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. घाबरलेले पक्षी त्या भागातून कायमचे निघून जातात, असे नमूद करण्यात आले आहे.