भारत व श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रात असलेल्या रामसेतूचा अभ्यास करण्याची संधी गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला (एनआयओ) मिळाली आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने याविषयीचा प्रस्ताव मंजुर केला आहे. एनआयओच्या वाट्याला राष्ट्रीय स्तरावरील एवढी मोठी कामगिरी प्रथमच आलीआहे.
राम सेतूशीनिगडीत दगडांच्या माळेचा अभ्यास करण्याविषयीचा प्रकल्प हा १ कोटी ३५ लाख रुपयांचा आहे. तीन वर्षांसाठी हा प्रकल्प आहे. हा सेतू मानव निर्मित असू शकतो असे नासाने यापूर्वी म्हटलेले आहे. एनआयओच्या अभ्यासाअंती कदाचित यावर अधिक प्रकाश पडेल असे जाणकारांना वाटते. राम सेतूचा अभ्यास करण्याविषयीचा प्रस्ताव हा गोव्याच्या एनआयओने पाठवला होता.
सीएसआयआर ह्या पालक संस्थेला एनआयओने पाठविलेला प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व खात्याने विचारात घेतला व आपली मान्यता दिली. यामुळे अभ्यासाचा मार्ग खुला झाला आहे. एनआयओचे गोवा संचालक सुनीलकुमार सिंग यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. शास्त्रीय पद्धतीने पुरातत्त्व खात्याच्या सहकार्याने अभ्यास केला जाईल. राम सेतूचा दगड काढून त्याचा अभ्यास होईल, शिवाय गरजेनुसार समुद्रात रामसेतूच्या जागी ड्रिलिंग वगैरे केले जाईल. दोन-तीन प्रकारचे सर्वेक्षण होईल. भूगर्भ शास्त्राचाही अभ्यास होईल, असे सुनीलकुमार सिंग म्हणाले.