पणजी : नाताळ, नववर्षानिमित्त येत्या काही दिवसात काळात गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड वाढणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यातील किनारे देशी पर्यटकांनी गजबजून जातील. या पार्श्वभूमीवर जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या कळंगुट किनाऱ्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी गोव्यात पर्यटक हवेत, पण ते दर्जेदार असावेत, असे मत व्यक्त केले आहे.
लोबो म्हणाले की, गोव्यात दारू स्वस्तात मिळते म्हणून येणारे पर्यटक लक्षणीय आहेत. शेजारी राज्यामधून असे पर्यटक येतात आणि ते केवळ दारूच खरेदी करून रात्री किनाऱ्यावर मौजमजा करतात आणि कचरा सोडून जातात. कचरा उचलण्याचे काम सरकारला आणि स्थानिक पंचायतीला करावे लागते.
लोबो म्हणाले की म्हणाले की, उघड्यावर दारू पिणाऱ्या तसेच अस्वच्छता करणाऱ्यांना दंड तसेच कैदेची कडक तरतूद असलेला कायदा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असे प्रकार चालूच राहणार असून दर्जेदार पर्यटक गोव्याला मिळू शकणार नाहीत.
रशिया, इंग्लंड तसेच अन्य राष्ट्रांमधून विदेशी पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. विद्यमान मंत्री पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनाच दोष देऊन चालणार नाही. गेल्या सहा वर्षात राज्य सरकारचे पर्यटन विषयक मार्केटिंग धोरण कोलमडले आहे. चुकीच्या धोरणामुळे गोव्याला दर्जेदार पर्यटक मिळू शकलेले नाहीत.
साफसफाईची समस्या कायम
लोबो म्हणाले की, किनाऱ्यांवर साफ सफाईची समस्या अजून कायम आहे. मधल्या पंधरा दिवसात कचरा उचलण्याचे काम बंद झाले त्यामुळे दृष्टी लाईफ सेविंग कंपनीचे काही कामगार काम सोडून गावाला गेले . त्यांना परत आणण्याचे तसेच ही व्यवस्था सुरळीत करण्याचे काम अजून मार्गी लागलेले नाही. किनारा सफाईचे काम घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपविणे आवश्यक आहे. कारण या मंडळाकडे २२ अभियंते आहेत. पर्यटन खात्याला साफसफाईचे काम करण्याचा कोणताही अनुभव नाही.
६० कोटींची विकासकामे
एका प्रश्नावर लोबो म्हणाले की, गेल्या चार वर्षांच्या काळात कळंगुट, बागा,कांदोळीत ६० कोटींहून अधिक खर्चाची विकासकामे झालेली आहेत. कळंगुट- बागा- सिकेरी असा १० कोटींचा पदपथ बांधण्यात आला असून पर्यटक तसेच स्थानिकाना ये, जा करण्यासाठी या पदपथाचा वापर होत आहे. कळंगुट बीच ते सेंट अलेक्स चर्च, नागवा ते हडफडे पदपथ झालेला आहे . याशिवाय किनाऱ्यावर सौंदर्यीकरणाचे काम केले आहे. किनाऱ्यावर पुरेशी प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या अशी सर्व व्यवस्था केलेली आहे. तरीसुद्धा काही देशी पर्यटक दारू पिऊन करून किनाऱ्यावरच घाण करतात. बाटल्या किनाऱ्यावर फेकतात. बाटल्या फुटल्यास किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्यांना काचा लागून रक्तबंबाळ होतात. त्यामुळे उघड्यावर बाटल्या फेकणार्यांना दहशत बसावी यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेली कायदा दुरुस्ती आणणे गरजेचे आहे. याबाबतीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मी बोललो आहे. ते या गोष्टीला अनुकूल आहेत.
लोबो म्हणाले की, थर्टी फर्स्टच्या रात्री खासकरून शेजारील राज्यातून कोल्हापूर, रत्नागिरी तसेच कर्नाटकातील बेळगाव, कारवार, हुबळी भागातून येणारे पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येतात. जेवण-खाण स्वतःबरोबर आणतात आणि येथे फक्त दारू खरेदी करून रात्रभर किनाऱ्यावर हैदोस घालतात आणि किनाऱ्यावर कचरा सोडून जातात अशा पर्यटकांनाही अद्दल घडली पाहिजे. गोव्यात पर्यटन व्यवसायिकांचे उत्पन्न वाढायचे असेल तर दर्जेदार पर्यटक अपेक्षित आहेत. वरील प्रकारांमुळे कळंगुट, बागा, कांदोळी अंजुना, वागातोर किनाऱ्याची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे आम्हाला दर्जेदार पर्यटक हवेत.