किशोर कुबल
पणजी : मावळत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे स्वागत आणि नाताळासाठी दरवर्षी पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’ होणारा गोवा यंदा मात्र सुना-सुना आहे. पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविलेली आहे. म्हादई नदीच्या पाण्यासाठी पर्यावरण संघटना आणि राजकीय पक्षांनीही आंदोलन पुकारत पर्यटकांनी गोव्यात येऊ नये, असा इशाराही दिला आहे. यंदा देशी-परदेशी पाहुण्यांची संख्या आधीच घटलेली आहे. त्यामुळे व्यावसायिक चांगलेच धास्तावलेले आहेत.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन पेटल्याच्या पार्श्वभूमीवर काही राष्ट्रांनी नागरिकांना भारतात न जाण्याचे आवाहन केले आहे. याचाही परिणाम झाला असावा, असे जाणकारांना वाटते. गोव्यात दरवर्षी साधारण ८0 लाख देशी आणि ६ ते ७ लाख परदेशी पर्यटक येतात. यंदा हा आकडा निम्म्यावर येईल. गोव्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिश पाहुण्यांचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक पर्यटक रशियातून येत असतात. थॉमस कूक कंपनी आठवड्याला सात चार्टर विमानांमधून कमीत कमी २१00 ब्रिटिश पर्यटक गोव्यात आणत असे. परंतु या खेपेला ही संख्या कमालीची घटली आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (इडीएम) भरवले आहेत. वागातोर येथे सनबर्न क्लासिकचा इडीएम २७ ते २९ रोजी आहे. यंदा पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला असेल तर तो जागतिक मंदीचा परिणाम असावा.- बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री, गोवासध्या विमान भाडे महागले आहे. टुरिस्ट टॅक्सीवाले नाताळ-नववर्षात भाडे वाढवतात. गोव्याच्या तुलनेत विदेशात पर्यटन स्वस्त झाले आहे, त्यामुळे पर्यटक तिकडे वळत असावेत.- सावियो मेशियस, अध्यक्ष, टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा