पणजी : अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार असल्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेऊन संपत्निक पूजा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
दर्शनाला जाताना मुख्यमंत्र्यांनी भगवा कुर्ता परिधान केला होता. मुख्यमंत्री सावंत तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार सपत्निक प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की,' गोव्याच्या जनतेसाठी मी प्रभू श्री रामचंद्राकडे प्रार्थना केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने भूखंड दिल्यास तेथे गोवा भवन उभारले जाईल. आज सकाळी मोपा विमानतळावरुन खास विमानाने २० हून अधिक आमदार अयोध्येला गेले. सोमवारी रात्री गोव्यातून रेलगाडीने गेलेले सुमारे १४०० रामभक्तही अयोध्येत पोचले. मुख्यमंत्री व अन्य मंत्रीगण तसेच आमदारांनी गोव्याहून गेलेल्या रामभक्तांसोबतच प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे तेथूनच दिल्लीला रवाना होणार असून पुढील तीन दिवस ते दिल्लीत असतील. उद्या शुक्रवारी गोव्यातील एसटी बांधवांच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतील. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटतील. १७ व १८ रोजी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनालाही ते उपस्थित राहणार आहेत.