लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना खरोखरच राज्याविषयी काही देणे-घेणे आहे, त्यांच्या सूचना भाजप सरकार ऐकून घेत आहे. पण काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत. असे कार्यकर्ते चांगल्या कामांना विरोध करतात, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै-वेर्णेकर यांनी केली. जे कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी काम करत आहेत त्यांचे सरकार ऐकते असे ते म्हणाले.
गुरुवारी भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते अॅड. यतिश नाईक व माजी आमदार ग्लेन टिकलो, गिरीश उस्कैकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'कोमुनिदाद जमिनींच्या रूपांतरणावर बंदीचा सरकारचा निर्णय हा सर्वांच्या हिताचा आहे. यामुळे अवैध बांधकाम आणि बेकायदेशीर जमिनीचा वापर थांबणार आहे. पण काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लस फरेरा यांनी यालाही राजकीय हेतूने विरोध केला. काँग्रेस जनतेच्या हितासाठी नाही तर राजकीय हितासाठी विरोध करत आहे.
अॅड. यतिश नाईक म्हणाले, नुकतेच सरकारने भाडेकरूंची पडताळणी करणारी मोहीम सुरू केली आहे. ती सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. आज राज्यात गुन्हे होत आहेत याला परप्रांतीय जबाबदार आहेत. त्यामुळे अशी पडताळणी केली तर गुन्हे कमी होतील. अशा निर्णयांचे विरोधकांनी स्वागत करायचे असते. पण ते विरोध करत आहेत.
गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, मोदींनी फक्त चार जातींना महत्त्व दिले आहे. यात युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्या विकासासाठी भाजप काम करत आहे. फा. फ्रान्सिस झेवियरवर आक्षेपार्ह विधान केले आहे तो सामाजिक कार्यकर्ता भाजपलाही टार्गेट करत आहे. त्यामुळे भाजप त्याला पाठिंबा देत नाही. ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांनी कायदेशीर तक्रार करावी. सरकार कारवाई करेल.
आलेमांव यांनी तो डीएनए तपासावा
गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे कुणीही जातीय सलोखा बिघडवला तर त्याला भाजपला जबाबदार धरतात. त्यांनी नुकतेच भाजपला जबाबदार धरून डीएनए चाचणी करावी, असे विधान केले आहे. युरींनी भाजपच्या डीएनएविषयी बोलू नये. अगोदर आलेमांवचा डीएनए काय आहे ते पाहावे. आलेमाव कुटुंबाला २०१२ च्या निवडणुकीत जनतेने नाकारले होते.