लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'कॉग्रेसचे नेते राहुल गांधी हे मानहानीकारक वक्तव्ये करण्याच्या एका नव्हे, तर अनेक प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्या वाईट सवयींमुळेच त्यांची खासदारकी गेली आहे,' असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे.
भाजप मुख्यालयात घेतलेल्या शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे म्हणाले की, न्यायालयाने दोषी घोषित केल्यानंतर आता राहुल गांधी हे भाजपवर आरोप करत आहेत, ते हास्यास्पद आहे. एक म्हणजे, स्वतः बेताल व बेजबाबदार वक्तव्ये करीत राहणार आणि न्यायालयाने कारवाई केल्यावर भाजपला दोष हे चुकीचे आहे. अनेक प्रकरणांत त्यांच्याविरोधात खटले चालू आहेत. अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. असे असतानाही राहुल हे सुधारत नाहीत, हे दुर्दैव आहे,' असे ते म्हणाले.
'राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवून तुरुंगवास ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली, याचा सर्वाधिक आनंद कॉग्रेस नेत्यांनाच झाला असावा. कारण अजून तरी या निर्णयाच्या विरोधात आव्हान देण्याची सूचना त्यांनी राहुल गांधी यांना केलेली नसावी,' असेही तानावडे म्हणाले. पक्षाचे प्रवक्ते दामू नाईक आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते..
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"