पणजी : भाजपाच्या राष्ट्रीय मंडळाच्या दिल्लीत होत असलेल्या बैठकीसाठी भाजपाचे अनेक आजी-माजी मंत्री, आमदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी आज गुरुवारी दिल्लीस रवाना होणार आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंडाची भूमिका घेतलेली असली तरी, तेही दिल्लीला जाऊन बैठकीत भाग घेणार आहेत.
गोव्याहून एकूण 64 भाजपा सदस्य दिल्लीतील बैठकीला अपेक्षित आहेत. भाजपाचे सगळे आमदार, खासदार तसेच भाजपाचे सगळे माजी प्रदेशाध्यक्षही दिल्लीतील बैठकीसाठी निघणार आहेत. 11 रोजी सकाळी दहा वाजता बैठक सुरू होईल. भाजपाचा अल्पसंख्यांक विभाग, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती, जमाती मोर्चा यांचेही अध्यक्ष दिल्लीतील बैठकीत सहभागी होणार आहेत. पार्सेकर हे भाजपाचे गोव्यातील दोनवेळचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पार्सेकर यांना दिल्लीतील भाजपा बैठकीत सहभागी होण्याची इच्छा अगोदर नव्हती. कारण त्यांना अंधारात ठेवून भाजपाचे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून भाजपामध्ये आणले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात सोपटे यांनी आमदारकीचा व काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते भाजपामध्ये प्रवेशकर्ते झाले.
सोपटे यांनीच 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पार्सेकर यांचा मोठा पराभव केला. पार्सेकर हे त्यावेळी मुख्यमंत्रीपदी होते. पार्सेकर यांचा पराभव होण्यासही मनोहर पर्रीकर व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचा हात आहे असा संशय पार्सेकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात गेल्या पाच महिन्यांत बळावला. पार्सेकर यांनी यापूर्वी पर्रीकर यांच्या खासगी निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर समितीच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला होता. मध्यंतरी त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. शहा यांच्याशी चर्चा करून ते परतले पण त्यांची भूमिका सौम्य झालेली नाही. मांद्रेत होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी सोपटे यांना जर भाजपाने तिकीट दिले तर पार्सेकर पक्षातून बाहेर पडू शकतात, असे संकेत मिळतात.
Attachments area