लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्याच्या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बैठक घेतली खरी, परंतु या बैठकीत सत्ताधारी आमदारांनी विविध सूर लावले, काही आमदार, मंत्र्यांनी आपापले प्रश्न मांडले. इतर सत्ताधारी आमदारांमध्ये मात्र आपण किती मते आणू हे सांगण्यासाठी जणू स्पर्धाच होती.
चंद्रशेखर यांच्यासमोर या उर्वरित सत्ताधारी आमदारांनी उमेदवाराला भरघोस मतें मिळवून देण्याचे दावे केले. मगोपचे आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रेत भाजप व मगोपने एकत्र काम केल्यास भाजप उमेदवाराला १०. हजारांपेक्षा जास्त मते मिळतील, असे ठामपणे सांगितले.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॉंग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपवासी झाले. या आमदारांसमोर लोकसभेत भाजप उमेदवारांना मते मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे. आपापल्या मतदारसंघात उमेदवाराला अधिकाधिक मते मिळवून देऊन भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मनात आपले करण्यासाठी स्थान भक्कम फुटीर आमदारांमध्ये चढाओढ आहे. मात्र नुवेंचे आमदार सिक्वेरा याला अपवाद ठरले. त्यांनी आपल्या मतदारसंघात भाजपला मते मिळणे कठीण असल्याचे स्पष्टच सांगून टाकले. दिगंबर कामत गळता सर्व सात फुटीर उपस्थित होते.
अहवाल दिल्लीला
राजीव चंद्रशेखर या बैठकीचा अहवाल घेऊन काल सायंकाळीच दिल्लीला परतले. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना हा अहवाल सादर केला जाईल. उमेदवार निश्चित करण्याआधी दोन्ही मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. त्या आधारावर पक्षाची राज्य निवडणूक समिती नावांची शिफारस करील व भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळ नावावर शिक्कामोर्तब करील. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच नावांची शिफारस, उमेदवार निश्चिती केल जाणार असल्याचे सांगण्यात आले.
स्वतंत्रपणे भेट नाहीच...
दरम्यान, इच्छुक उमेदवारांना राजीव चंद्रशेखर यांची स्वतंत्रपणे भेट घेण्याची इच्छा होती. परंतु ते शक्य झाले नाही कारण चंद्रशेखर यांनी हॉलमध्येच प्रत्येकाचे म्हणणे सर्वांसमक्षच ऐकून घेतले. यात इच्छुक उमेदवारही होते.
ख्रिस्ती मतें मिळणे कठीण!
नुर्वेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यानी आपला मतदारसंघ ख्रिस्तीबहुल असल्याने व भाजपचे या मतदारसंघात तसे काहीच अस्तित्त्व नसल्याने मतें मिळणे कठीण असल्याचे चंद्रशेखर यांना सडेतोडपणे सांगितले. ख्रिस्ती मतांसाठी प्रयत्न करावे लागतील असे ते म्हणाले. आलेक्स हे या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. आठजण फुटले त्यात त्यांचा समावेश होता.
आधी रस्ते, पाणी, वीज सुधारा
'ताळगावमध्ये आधी लोकांना रस्ते, पाणी, वीज या सुविधा पुरविण्याची गरज आहे. रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. पाणी वेळेवर मिळत नाही. विजेचा लपंडाव असतो. मूलभूत सुविधा नसतील तर लोक मते कशी देतील? तरीही मी भाजपला ५ हजार मतांचे लीड मिळवून देईन. - जेनिफर मोन्सेरात, आमदार.
हस्तक्षेप आधी थांबवा
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व त्यांची पत्नी सावित्री यांचा सांगे मतदारसंघात अजूनही हस्तक्षेप चालू आहे. तो बंद व्हायला हवा. सावित्री कवळेकर यांच्याकडून सांगे मतदारसंघात अजून शुभेच्छांचे बॅनर्स लावले जातात. पराभूत होऊनही त्यांचा तसेच केपेंचे माजी आमदार बाबू कवळेकर यांचे सांगे मतदारसंघात काम चालू आहे. कवळेकर हे भाजपच्या कोअर कमिटीवर आहेत. ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्षही आहेत. मी सांगेत एकदा पराभूत झालो. यावेळी मी लीड देईन, पण सावित्री यांचा सांगेतील हस्तक्षेप रोखावा. - सुभाष फळदेसाई, समाज कल्याणमंत्री.