देशाच्या विविध भागात अनेक राजकारणी आपण खासदार व्हावे म्हणून धडपडतात. लोकसभेचे तिकीट आपल्याला मिळावे, आपणही लोकसभेत पोहोचावे म्हणून भाजपमध्ये व काँग्रेसमध्येही इच्छुकांची मोठी स्पर्धा सुरू असते. गोव्यात मात्र वेगळाच अनुभव येतोय. 'गोवा के लोग अजीब है।' असे म्हणतात ते खरेच, मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सिनिअर नेते. त्यांना केंद्रातील भाजप नेते खासदारकीचे तिकीट देऊ पाहतात. आता केंद्रातील भाजपवाले कामतांच्या का म्हणून प्रेमात पडलेयत कळत नाही. दिगंबरांचा मायनिंगचा विषय तर भाजपच्याच दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांनी आठ वर्षांपूर्वी गाजवला होता. अर्थात कामत यांच्या काळात खाण बंदी कधी आली नव्हती. ती भाजप सरकारच्या काळात आली. त्याचे चांगले वाईट परिणाम गोव्याने भोगलेच.
परवा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. कोअर कमिटी थोर असते. त्यात थोरामोठ्यांचा समावेश असतो. या बैठकीस भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद उपस्थित होते, दक्षिण गोव्यात भाजपतर्फे कुणाला तिकीट द्यावे, यावर चर्चा झाली. गोविंद पर्वतकर आणि उल्हास अस्नोडकर यांनी मिळून शंभरहून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, राज्यभरातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मग दक्षिणेसाठी पाच नावे निवडली होती. या पाच जणांच्या नावांमध्ये चक्क सभापती रमेश तवडकर यांचेही नाव आले, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचेही नाव आले. तेव्हा कामत यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट केले.
कामत यांचा नकार ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मनातून किंचित हसायला आले असेल. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हेही बैठकीस होते. त्यांनी दिगंबर काय बोलतात, हे कान देऊन ऐकले, कामत यांनी तिकिटाविषयी नकारार्थी उत्तर दिले तरी, आशिष सूद बोलले की- पाचही नावे आम्हाला भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवावी लागतील. आम्ही कुणाचे नाव कट करू शकत नाही, जे नाव आमच्यासमोर आलेय, ते नाव आपण पाठवूया, असे सूद यांनी सुचविले. त्यामुळे कामतांचा नाईलाज झाला.
कामत यांना खरोखर खासदार होण्याची इच्छा नाही का? कामत यांना भाजपच्या हायकमांडने जर लोकसभेचे तिकीट दिलेच, तर ते नाकारण्याचे धाडस ते करू शकतील का? मनोहर पर्रीकरही केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जाऊ पाहत नव्हते. त्यांना गोव्यात मुख्यमंत्री बनून राज्य करायचे होते. कारण २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय जनतेने पर्रीकर यांनाच कौल दिला होता, मात्र भाजपच्या हायकमांडने आदेश दिल्यानंतर पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदाचे अलंकार उतरवून दिल्ली गाठावी लागली होती. त्यावेळी लक्ष्मीकांत पार्सेकर लकी ठरले आणि सीएम झाले, हा मुद्दा वेगळा.
कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या दिवसांत कदाचित भाजप श्रेष्ठींनी कामत यांना भविष्यात योग्य स्थान द्यावे, असे ठरवलेले असू शकते. कामत यांना अलीकडेच भाजप गोवा प्रदेश कोअर टीमचेही सदस्यत्व मिळाले. पक्षात त्यांचा मान राखला जात आहे. मात्र कामत मंत्री होतील, त्यांच्याकडे टीसीपी खाते येईल वगैरे चर्चा मध्यंतरी रंगली होती. मुख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रिमंडळात कामत उपमुख्यमंत्री होतील, असेही ढोल काही जण वाजवत होते. मात्र तसे काही घडले नाही.
वाढत्या वयानुसार आरोग्याच्या तक्रारी पुढे येत असतात, त्यामुळेही कामत यांना खासदारकीचे तिकीट नको, असे वाटत असावे. समजा भविष्यात कामत यांना भाजप श्रेष्ठींनी गोव्यात मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला, तर काय होईल याची कल्पना आता करता येत नाही. रमेश तवडकर यांनीदेखील आपल्यालाही खासदारकीचे तिकीट नको, असे जाहीर केले आहे तवडकर यांनादेखील भविष्यात मुख्यमंत्रिपदाची ऑफर येण्याची शक्यता आहे का? अर्थात सध्या तसे काही घडत नाही; पण कामत, तवडकर हे सगळे खासदारकीचे तिकीट नको म्हणतात, याउलट उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक मात्र तिकीट सोडण्यास कसेच तयार नाहीत. गोव्याच्या राजकारणात व भाजपमध्ये ही दोन टोके सध्या अनुभवास येत आहेत.